श्रीगोंदा,दि.२ एप्रिल,(प्रतिनिधी) – कामावर उशिरा का आलास..? असे विचारल्याने संतप्त झालेल्या कामगाराने चाकूने सपासप वार करून मालकिणीचा खून केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव या गावात घडली आहे. याप्रकरणी खंडू काशिनाथ चंदन यांच्या फिर्यादीवरून मयूर संजय भागवत यांच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे विवेक आर्टस् हा गणपती मूर्ती बनवण्यच्या कारखान्यात कामास असणाऱ्या मयूर भागवत या मूर्ती कारागिराने शुल्लक कारणावरून कारखान्याच्या मालक असणाऱ्या ताराबाई काशिनाथ चंदन या 72 वर्षीय वयोवृद्ध महिलेवर चाकूने साप सप वार करून गंभीर जखमी केले होते.
मात्र गंभीर जखमी अवस्थेत ताराबाई यांना अहमदनगर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी आणले असताना उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला मयूर भागवत याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र ताराबाई यांचा मृत्यू झाल्यानंतर खून करणे 302 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर हा 30 मार्च रोजी सुट्टी घेऊन अहमदनगर येथे आपल्या घरी गेला होता मात्र त्याला कामावर येण्यास उशीर झाल्याने ताराबाई चंदन याने त्याला याबाबत तु कामावर काल येणार होता उशीर का केलास असे विचारले होते. यावर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती.
मात्र यावेळी ताराबाई यांच्या मुलाने हे भांडण सोडवले होते. रात्री अकराच्या सुमारास सर्व जण जेवण करून झोपायला गेले असता, साडेअकराच्या सुमारास आरोपीने ताराबाई यांच्या मानेवर आणि हातावर चाकूने वार केले. ताराबाईंनी आरडाओरडा केल्याने कुटुंबातील सर्व जण त्यांच्याकडे गेले, तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व मयूर हातात चाकू घेऊन उभा असल्याचे दिसले. आरोपीने चाकू टाकून पळ काढला. त्यावेळी चुलतभाऊ आकाश चंदन व शेजारी गौरव पुरी यांनी पाठलाग करून त्याला पकडले. दरम्यान, ताराबाई गंभीर जखमी झाल्यामुळे, त्यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी मयूर भागवत याला पोलिसांनी अटक केली आहे.