अहमदनगर,दि.१८ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र महिला विकास मंचच्या वतीने गुरुवारी (दि.१९ जानेवारी) रोजी राळेगणसिध्दी (ता. पारनेर) त्रिरत्न महिला प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे व स्वतःचे अस्तित्व निर्माण करणार्या कर्तृत्वान महिलांना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. या सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील संघटनेच्या महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असून, सर्व महिलांना या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र महिला विकास मंचच्या जिल्हाध्यक्षा अनिता काळे यांनी केले आहे.
या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार निलेश लंके, शेखर मुंदडा, अॅड. वर्षाताई देशपांडे, प्रमोदजी झिंजाडे, महाराष्ट्र महिला विकास मंचच्या अध्यक्षा कालिंदीताई ठुबे, उपाध्यक्ष विनीता दिवेकर आदी पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमातून स्त्रीशक्तीचा जागर केला जाणार असून, महिला मेळाव्यातून विविध प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. तर संघटनेत जास्तीत जास्त महिलांना सहभागी करुन घेतले जाणार असल्याचे काळे यांनी म्हंटले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र महिला विकास मंचची सर्व टीम परिश्रम घेत आहे.