मुंबई, २२ जानेवारी –
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार असल्याची अधिकृत घोषणा उद्या होणार असल्याची शक्यता आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन या युतीची अधिकृत घोषणा उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या एकत्र येण्याने राज्यात नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या एकत्र येण्यावर मोठे भाष्य केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या होणाऱ्या युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
‘मी आज अमरावतीला आहे. येथून नागपूरला जाणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती संदर्भात बोलणी चालू आहे. उद्धव ठाकरे यांचे फायनल झाले की घोषणा होईल. ठाकरे यांना वाटते की राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊ. जेव्हा त्यांची बोलणी झाली की मग निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
आंबेडकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्याच्या एका वक्तव्यावर देखील भाष्य केले आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणत आहे की तिसरे इंजिन लावू, त्यामुळे ते राष्ट्रवादी की मनसेमधील एक लावणार? याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच सांगतील, असे आंबेडकर पुढे म्हणाले.
महायुतीत सामील होण्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला नाकारलेलं होतं. आम्ही त्यांना नाकारलेले नाही. आम्ही केवळ दलितांपूर्वी पुरतं मर्यादित राहावे अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका आहे. त्यांची ती भूमिका आम्हाला मान्य नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत बोलत नाही. त्यांना गरज असेल तर त्यांनी आमच्याशी बोलावे’.
शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आल्यास आमचा विरोध नाही. अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेनंतर महायुतीमधील वरिष्ठ नेते काय प्रतिक्रिया देतात,हे पाहावे लागणार आहे.