अहमदनगर,दि.१९ मार्च,(प्रतिनिधी) – शेतातला माल हा शेतकऱ्याच्या आयुष्यातला खजिना असतो. शेतातलं पीक हे शेतकऱ्यांच्या आयुष्यातलं सोनं असतं. पण हाच खजिना अवकाळी पावसाने हिरावून नेला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत. शेतातला गहू, हरभरा, फळांच्या बागा पाहून आनंद आणि समाधान व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांचं एक दिवसात होत्याच नव्हतं झालंय. संपूर्ण पीकं जमीनदोस्त झाली आहेत. शेतातला माल विकून आपण आपल्या आयुष्याला आणखी चांगल्याप्रकारे जगू. सगळं कर्ज फेडू, मुलांचं चांगल्या शाळेत शिक्षण करु, मुलीचं लग्न करु, असे अनेक विचार शेतकऱ्यांच्या मनात होते. पण सारं जागेवर राहून गेलंय.
अहमदनगर जिल्ह्यातील अनेक गावांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. राहाता तालुक्यातील राजुरी, ममदापूर परिसरात तर प्रचंड गारपीट झाल्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाजी दळे या शेतकऱ्याची तीन एकर द्राक्षबाग गारपिटीने उद्धवस्त झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. दळे यांच्या बागेत द्राक्ष पिकाचा (Grapes crop) अक्षरशः सडा पडल्याचं विदारक चित्र दिसत असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी शिवाजी दळे हवालदिल झालेत आहेत.
जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातही आज गारांचा पाऊस पडला. चंदनापुरी, साकुरसह अनेक गावात गारपीटीसह जोरदार पाऊस पडला. त्यामुळे अनेक पिकांना याचा फटका बसला. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. कांदा, टोमॅटो, मिरची, द्राक्ष यासह फुल शेतीलाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
गहू, मका, कांदे पालेभाज्या आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमीन उध्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर हात तोंडाशी आलेला पीक भुईसपाट झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे.