Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

अहमदनगर,दि.३० एप्रिल,(प्रतिनिधी) – राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. ३० एप्रिल तसेच १, २ व ३ मे रोजी अवकाळी पाऊस पडणार आहे. गारपिटीसह हा पाऊस राज्यातील अनेक भागांत असणार आहे.

त्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. ३० एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. तर विदर्भात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १, २ व ३ मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. विदर्भात १ मे रोजी गारपीट तर २ आणि ३ मे रोजी पाऊस पडणार असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

अहमदनगर जिल्हयात २९ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीमध्ये वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा, गारपीट व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये.

सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्स पासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वारा व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी व जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!