नगर शहरात पोलिसांचे मॉकड्रील
अहमदनगर,दि.१६ जानेवारी,(प्रतिनिधी) – रविवारी दुपारच्यावेळी रेंगाळलेल्या जुन्या माळीवाडा बसस्थानकात अचानक चोहोबाजूने बंदूकधारी पोलिस घुसल्याने व त्याचवेळी बसस्थानकात अतिरेकी असल्याची चर्चा सुरू झाल्याने बसची वाट पाहात थांबलेल्या प्रवाशांमध्ये घाबरगुंडी उडाली…पोलिसही बसस्थानकात शोधाशोध करू लागल्याने या घबराटीत आणखीच भर पडली…पण अखेर, काही वेळातच सारा उलगडा झाला आणि अचानक काही दुर्दैवी घटना घडली तर तत्पर असावे म्हणून पोलिसांनी बसस्थानकात प्रात्यक्षिक (मॉक ड्रील) केल्याचे स्पष्ट झाले.
या प्रात्यक्षिक कारवाईत पोलिसांनी तीन अतिरेक्यांना जेरबंद केले आणि त्यांना घेऊन बसस्थानकाच्या बाहेर पडणार्या पोलिसांच्या गाड्या पाहून प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला व चेहर्यावर हसूही उमटले. पोलिसांच्या या प्रात्यक्षिकांचीच चर्चा त्यानंतर त्यांच्यात रंगली.
मकर संक्रांतीमुळे माळीवाडा बस स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. काही प्रवासी बसची वाट पाहत उभे होते. अशातच पोलिसांसह बंदूकधारी स्पेशल कमांडोंचा ताफा बस स्थानकात घुसला अन् सार्यांचीच तारांबळ उडाली. बस स्थानकात अतिरेकी घुसल्याची वार्ता सर्वत्र परसली. पोलिसांनी तब्बल दीड तास सर्च ऑपरेशन राबवत तीन अतिरेकी जेरबंद केले. प्रत्यक्षात पोलिसांचे हे
प्रात्यक्षिक असल्याचे समजल्यावर सार्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.
रविवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास बस स्थानकात अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांना आला व यंत्रणेची धावपळ उडाली. अवघ्या पंधरा मिनिटात शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी, नगर तालुका, भिंगार पोलिसांची पथके बसस्थानकात दाखल झाली. महापालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक, रुग्णवाहिकाही पोहोचल्या. अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपअधीक्षक अजित पाटील यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, वरिष्ठ अधिकारीही आले. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर नेले. अतिरेक्यांनी काही प्रवाशांना ओलीस ठेवल्याने पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत प्रवाशांची सुटका केली व अतिरेक्यांना जेरबंद केले. हा थरार पाहून नागरीक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, अखेर हे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.