Homeनगर जिल्हातीन बिबट्याने फस्त केल्या ४०० कोंबड्या

तीन बिबट्याने फस्त केल्या ४०० कोंबड्या

अकोले,दि.८ जानेवारी,(प्रतिनिधी) – तालुक्यातील मेहेंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी घुसून सुमारे ४०० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्यांचा या परिसरात नेहमीच वावर असतो. काही दिवसांपूर्वी अकोले वनविभागाने या परिसरातून एका बिबट्यालाही जेरबंद केले आहे. तसेच सध्या या परिसरात अनेक बिबटे संचार करीत आहेत.

शुक्रवारी रात्री १ वाजल्याच्या सुमारास सुधीर बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये एक नव्हे तर तीन बिबटे घुसले. बिबट्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घालत शेकडो कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले. यामध्ये अनेक कोंबड्यांना जखमी केले. बिबट्यांच्या या हल्ल्यात सुमारे ४०० कोंबड्या दगावल्या आहेत. पोल्ट्री मालक सुधीर बंगाळ यांना पहाटे चार वाजता बिबटे पोल्ट्रीत घुसल्याची जाणीव झाली. यावेळी त्यांनी पोल्ट्री जवळ जाऊन पाहिले असता बिबट्यांनी त्यांना पाहून पोल्ट्रीच्या कुंपणावरून उडी मारत उसाच्या शेतात पळ काढला.

शनिवारी सकाळी अकोले वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी जाऊन मृत आणि जखमी कोंबड्यांचा पंचनामा केला आहे. सुधीर बंगाळ या शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व मृत कोंबड्या मोठा खड्डा खोदून गाडून टाकण्यात आल्या. अकोले तालुक्यात बिबट्यांचा मोठा उपद्रव वाढला असून वनविभागाने याठिकाणी पिंजरे लावून बिबटे जेरबंद करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!