हे आहेत टॉपचे पाच सदस्य
मुंबई,दि.५ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – बिग बॉस मराठी ४’ पुन्हा एकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. बिग बॉसचा हा सीझनही अंतिम टप्यात आला आहे. सीझनच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकजण आणखी चांगलं खेळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत होते, मात्र या सिझनने प्रेक्षकांची पुरती निराशा केली. मराठी बिग बॉसच्या इतिहासात हा एकमेव सीझन ठरला ज्यात सगळयात जास्त चुकीचं एलिमिनेशन केलं गेलं. कित्येक चांगले सदस्य घराबाहेर झाल्याने प्रेक्षक बिग बॉसवर नाराज आहेत. येत्या ८ जानेवारीला या सीझनचा अंतिम सोहळा पार पडणार आहे. मात्र अशातच टॉप ५ सदस्यांसाठी घरात मीड वीक एव्हिक्शन घेण्यात आलं. त्यात घरातील आणखी एक सदस्य घराबाहेर झाला आहे.
यावेळी घराबाहेर होण्यासाठी पाच सदस्य पात्र होते. अपूर्वा नेमळेकर यापूर्वीच तिकीट टू फिनाले मिळवून अंतिम सोहळ्यात पोहोचली आहे. मात्र नुकत्याच झालेल्या एलिमिनेशनमध्ये आणखी एका सदस्याला घराबाहेर व्हावं लागलं आहे. यासाठी अमृता धोंगडे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर, राखी सावंत आणि किरण माने यांच्यात एक खेळ खेळण्यात आला. यात आरोह वेलणकर याला यावेळेस घराबाहेर व्हावं लागलं आहे. सिझनच्या अंतिम टप्प्यावर येऊन आरोहला घराबाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे त्याचे चाहतेही नाराज झाले आहेत.
आता या सिझनला त्याचे टॉप ५ स्पर्धक मिळाले आहेत. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने, राखी सावंत आणि अमृता धोंगडे यांचा समावेश आहे. या पाच स्पर्धकांमध्ये आता बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी चुरस लागणार आहे. आता या पाच स्पर्धकांपैकी नक्की कोण बाजी मारणार हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे. त्यातही अपूर्वा, किरण आणि अक्षय हे या ट्रॉफीसाठी टॉप ३ मध्ये असू शकतात असा नेटकऱ्यांचा अंदाज आहे. मात्र आता या सिझनचा विजेता कोण ठरणार हे पाहण्यासाठी नेटकरीही उत्सुक आहेत.