अहमदनगर,दि.२७ डिसेंबर,(प्रतिनिधी) – अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेत आयोजित कला, कार्यानुभव, गणित, विज्ञान, भूगोल पर्यावरण व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन कृत्रिम पुष्परचना तज्ञ दिपाली देऊतकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट रांगोळी रेखाटून स्त्री भ्रूण हत्या, पर्यावरण रक्षण व महिलांवरील अत्याचार थांबविण्याचा सामाजिक संदेश दिला. विज्ञान, भूगोल, पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प सादर करुन आपल्यातील कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक दाखवली. तर कुंचल्यातून कागदावर रेखाटलेल्या चित्र हुबेहूब जिवंत केले. या प्रदर्शनास शिक्षक व पालकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे विश्वस्त अॅड. गौरव मिरीकर, भूषण भंडारी, शैलेश मुनोत, मनीषा गुगळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, उपमुख्याध्यापिका सुषमा चिटमिल, पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, रवींद्र शिंदे, शिक्षक प्रतिनिधी अशा सातपुते, विद्यार्थी प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट उपकरणे, शैक्षणिक तक्ते, सामाजिक संदेश देणार्या रांगोळ्या व विविध आकर्षक पुष्परचना साकारल्या होत्या. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पाहुण्यांनी मांडलेल्या कलाकृतीचे व प्रकल्पांचे विशेष कौतुक केले. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.