अनामप्रेमचा व्हील चेअर युजर्ससाठी उपक्रम
अहमदनगर,दि.२९ जानेवारी,(प्रतिनिधी) – दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसनाचे काम करणारी अनामप्रेम संस्था स्पायनल कॉर्ड इन्जुरी पुनर्वसन केंद्र उद्या सुरू करीत आहे. अपघाताने अथवा स्पायनल कॉर्ड च्या इन्जुरी मुळे ज्यांचे जीवन व्हील चेअरवर अवलंबून झाले आहे अशा महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग यांच्यासाठी हे केंद्र पुनर्वसनाची नवदृष्टी देणारे ठरणार आहे. रविवार दि. 29 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता व्हीलचेअर्स युजर्स ची प्रेरणा असणारे डॉ.विजय गर्दे , खा.डॉ.सुजय विखे, विळद हॉस्पिटलचे डॉ.अभिजीत दिवटे, विखे पाटील फिजिओथेरपी कॉलेज चे प्राचार्य डॉ.श्याम गणवीर, अहमदनगर रिहॅब सेंटर चे डॉ.किशनलाल राजपूत, अनामप्रेम चे विश्वस्त डॉ.बापूसाहेब कांडेकर, इंजि.अजित माने,प्रख्यात लोकसेवक डॉ.प्रकाश शेठ, उद्योजिका राजश्री पाटील, स्नेहालय चे अध्यक्ष संजय गुगळे व सचिव राजीव गुजर यांच्या हस्ते व उपस्थितीत हे केंद्र कार्यान्वित होत आहे.
पुणे येथील उद्योजक सौ.कुंदा व श्री यशवंत आध्ये यांनी त्यांच्या स्वतःच्या आर्थिक सहयोगातून अनामप्रेम संस्थेत यशवंत प्रकल्प ही इमारत बांधून दिली. अनामप्रेम च्या एसळक येथील जागेत आधारग्राम हा दिव्यांग यांच्या पुनर्वसन उपक्रमाची योजना अनामप्रेम ने बनविली. यातील पहिला प्रकल्प यशवंत प्रकल्प मागील वर्षी बांधून पूर्ण करण्यात आला.येथे सुलभ व सुगम्य अपंगांकरिता इमारत असल्याने स्पायनल कॉर्ड इन्जुरी पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येत आहे.
स्पायनल कॉर्ड इन्जुरी पुनर्वसन केंद्र
अनामप्रेम संस्था अंध, अपंग, मूकबधिर, अस्थिव्यंग मुला-मुलींच्या पुनर्वसनाकरिता विविध निवासी उपक्रम चालविते. सध्या 200 अपंग अनामप्रेम मध्ये राहतात व शिक्षण घेतात. समाजात स्पायनल कॉर्ड इन्जुरी चे अनेक रुग्ण आहेत. अपघात अथवा स्पायनल कॉर्ड च्या प्रश्नाने अनेक दिव्यांग यांचे जीवन एकाजागी बंधनात अडकले आहे. फिजिओथेरपी व योग्य प्रशिक्षण, आनंदमय जीवन पद्धतीने अशा व्हील चेअर वरील अपंग यांचे जीवन सुखकर होऊ शकते. व्हील चेअर वरील रुग्ण यांना सुखकर स्वच्छता गृह वापरता यावे,कपडे घालता यावे, स्वतःचा छंद जोपासता यावा,फिजिओथेरपी मिळावी असा उद्देश या केंद्राचा असणार आहे. प्रत्येक 6 महिन्याला 10 रुग्ण यांना प्रवेश येथे दिला जाणार आहे. पहिल्या 2 महिन्यात पुरुष रुग्ण यांना प्रवेश दिला जाणार असून दुसऱ्या टप्प्यात महिला रुग्ण यांना प्रवेश दिला जाणार आहे.
डॉ.विखे पाटील फिजिओथेरपी कॉलेज चे प्राचार्य डॉ.श्याम गणवीर,प्राध्यापिका सुवर्णा गणवीर तसेच संपूर्ण फिजिओथेरपी कॉलेजचे विशेष सहकार्य या केंद्राला मिळणार आहे. डॉ.विजय गर्दे यांचे या केंद्राला प्रमुख मार्गदर्शन असून उद्योजिका आणि स्वतः व्हील चेअर युजर्स यांच्या प्रेरणा राजश्री पाटील, अनामप्रेम चे उपाध्यक्ष डॉ.प्रकाश शेठ, जे.आर.मंत्री, डॉ.मेघना मराठे, प्रकल्प प्रमुख उमेश पंडुरे, विष्णू वारकरी, विक्रम प्रभू, विद्या रानवडे हे या अनोख्या व दिव्यांग पुनर्वसनातील मूलभूत सेवा कामाच्या उपयोगीतेसाठी धडपडत आहेत.