अहमदनगर,दि.१९ जानेवारी,(प्रतिनिधी) – यंदाच्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘घात’ (Ghath) या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. दि.16 ते 26 फेब्रुवारी 2023 या कालावधीत बर्लिन येथे जगातील आघाडीचा चित्रपट महोत्सव होत आहे. या चित्रपटात नगरचे कलाकार मिलिंद शिंदे यांची प्रमुख भूमिका आहे. सोबतच या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. मिलिंद शिंदे यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. छत्रपाल निनावे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. छत्रपाल यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे. ज्यात शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण आयुष्य ये एकमेकांवर आधारीत आहे.
या चित्रपटाविषयी छत्रपाल म्हणाले, ‘हा एक मोठा, खडतर आणि साहसी प्रवास होता, पण आता बर्लिन येथे आमच्या चित्रपटाचा प्रीमियर होणे हा खूप मोठा सन्मान वाटतो. या वाटेवर आम्हाला अनेक कलाकारांनी प्रेरणा दिली. ‘घात’ हा चित्रपट विश्वास, विश्वासघात आणि हल्ला यावर आधारलेला आहे. घनदाट जंगलात शिरताना त्यातील व्यक्तिरेखांच्याही मनांत खोलवर नेणारा हा थ्रिलरपट आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास ठेवल्याबद्दल मी प्लॅटून वन फिल्म्स आणि दृष्यम फिल्म्सचा आभारी आहे. बर्लिन, भारत आणि त्यापलीकडील्याही प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी मला आशा आहे.’
अभिनेता जितेंद्र जोशी त्याला आलेला शूटिंगचा अनुभव सांगत म्हणाला, ‘मध्य भारतातील जंगलातील लोकेशन्सवर शूटिंग करणे नक्कीच अवघड आणि आव्हानात्मक होते, पण या अतुलनीय बातमीमुळे केलेली मेहनत फळाला आल्याचे वाटते. चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू यांनी खूप मेहनत घेतली असल्यामुळे टीमसाठी, मराठी सिनेमासाठी आणि संपूर्ण भारतीय सिनेमासाठी हा एक मोठा विजय आहे.’