मुंबई, दि.१६ जानेवारी –
खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत उद्या दुपारी ४ वाजता सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात होणाऱ्या या सुनावणीचा निकाल उद्याच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
राज्यात महाविकासआघाडीचे सरकार असताना,एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत बंड केले आहे. यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेना आमचीच आहे असा दावाही शिंदे यांनी केला. तर उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले असून शिवसेना नेमकी कुणाची यावर निवडणूक आयोगासमोर प्रत्यक्ष युक्तिवाद सुरू आहे. याबाबत उद्या निकाल येण्याची शक्यता आहे.