काष्टी,दि.२५ जानेवारी,(प्रतिनिधी) – दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले असून या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये सासू-सासरे, जावई-मुलगी आणि तीन नातवंडांचा समावेश आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर घातपात की आत्महत्या असा प्रश्न उपस्थित झाला होता. पोलीस चौकशीनंतर हा प्रकार सामूहिक आत्महत्येचा असल्याचं समोर आलं आहे. १७ जानेवारीच्या रात्री ७ जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मोहन उत्तम पवार, संगीता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी चार मृत व्यक्तींची नावं आहेत. शाम आणि राणी फुलवरे यांची तीन मुले गायब होती. त्यांचे मृतदेहदेखील आज भीमा नदीत सापडले आहेत.
दरम्यान, पारगाव हद्दीत भीमा नदीत वरील चार मृतदेह आढळून आले, त्याच्या आसपासच आज (ता. २४ जानेवारी) पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले. एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल आढळून आला. त्यावर संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. नातेवाईकांना दाखवून सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात आली आहे. या सर्व मृतदेहांचे पोस्टपार्टम यवत ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले आहे.
मोहन उत्तम पवार (वय ४५), त्यांची पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव, ता. गेवराई, जि. बीड), श्याम पंडीत फुलवरे (वय २८ जावई), राणी श्याम फुलवरे (वय २४ मुलगी), रितेश ऊर्फ भैया श्याम फुलवरे (वय ०७), छोटू श्याम फुलवरे (वय ०५), कृष्णा श्याम फुलवरे (वय ०३, सर्व रा. हातोला, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) अशी मृतदेह सापडलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पवार पती-पत्नी हे बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील खामगाव येथील मूळचे आहेत. त्यांचे जावई श्याम फुलवरे व त्यांचे कुटुंबीय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत. ते मजुरीसाठी निघोज येथे आले होते. त्या ठिकाणी एका वर्षापासून ते मोलमजुरीचे काम करत होते. या सर्वांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात आढळून आले आहेत. या ठिकाणापासून नगर जिल्ह्याची हद्द जवळ आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पवार आणि फुलवरे कुटुंबीय हे वर्षभरापूर्वी निघोजमध्ये कामासाठी आले हेाते. हे सर्वजण निघोजमध्ये राहत होते. मात्र, पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात १८ जानेवारी एका महिलेचा मृतदेह आढळला. त्यानंतर २० जानेवारी रोजी एका पुरुषाचा, ता. २१ जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह, तर २२ जानेवारी पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
माहितीनुसार, मोहन पवार यांना दोन मुले आहेत. या दोन मुलांपैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहत होता. तर राहुल हा पुण्यामध्ये राहत होता. तर अमोलने काही दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातील एक विवाहित मुलगी पळवून आणली होती. यामुळे पवार कुटुंबीय तणावात होते. मुलाने पळवून आणलेली मुलगी नात्यातलीच असल्याने समाजात आपली बदनामी होईल. या भीतीने त्या मुलीला तिच्या घरी सोडून ये, अन्यथा आम्ही जीव देऊ, घरचे मुलाला सांगत होते.
मात्र, सांगूनही अमोलने मुलीला परत पाठवले नाही. त्यामुळे मोहन पवार यांनी पुण्यात राहणाऱ्या मुलाला फोन करून सांगितलं की आमची बदनामी होतेय. अमोलने मुलीला परत तीच्या घरी न सोडल्यास आम्ही सर्वजण जीव देणार आहोत. असं त्या मुलाला सांगितलं. त्यानंतर सर्व कुटुंबीय घराबाहेर पडलं आणि बेपत्ता झालं. त्यानंतर या सर्वांचे मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळून आले.