श्रीगोंदा, दि.२१जानेवारी,(प्रतिनिधी) – ढवळगाव (ता. श्रीगोंदा) येथील एका बलात्कार पिडीत विवाहित तरुणीने आपल्या आई – वडिलांच्या राहत्या घरी आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन आज ढवळगाव (ता. श्रीगोंदा)
येथील आठ जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्या तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जबाबदार असणाऱ्या नावांचा उल्लेख केल्याचे पिडीत मुलीच्या आईकडुन समजते.
पीडितेच्या आईने सांगितले, मागील आठवड्यात दि.११ जानेवारीला त्या पीडितेने बेलवंडी पोलिस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दिली होती. दरम्यानच्या काळात दाखल केलेली ही फिर्याद मागे घेण्यासाठी तब्बल आठ जणांनी तिचा पुन्हा छळ केल्याची फिर्याद पीडितेच्या आईने दिली आहे. त्यामुळेच या मानसिक तणावातुन पिडित मुलीने दुपारी ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मयत मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. त्यामुळे तिने चिठ्ठीत उल्लेख केलेल्या नावांच्या विरोधात आता आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील सर्वच आरोपींनी पीडितेस बलात्काराची फिर्याद मागे घेण्यासाठी मानसिक त्रास दिला. तसेच शस्त्रांचा धाक दाखवून संपूर्ण कुटुंब संपवून टाकण्याची देखील धमकी दिली. त्यातूनच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले. दरम्यान, आत्महत्या केलेल्या ते मुलीच्या आईने घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला. मयत मुलीची आई अंगणवाडी सेविका असून, आज सकाळी ती कामानिमित्त घराबाहेर पडली होती. त्यावेळी मुलीने आईला मी तुझ्याबरोबर येऊ का? अशी विचारणा केली. मात्र, आपण पुढील गुरुवारी जाऊ असे आईने सांगितले व ती कामावर निघून गेली. आपले कामकाज आटोपून त्या घरी परतल्या तेव्हा घराचा दरवाजा आतून केवळ ढकललेला होता. दरवाजा लोटून आईने घरात प्रवेश केल्यानंतर खोलीत बांबूला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेतील मुलगी त्यांना दिसली. त्यांनी घाबरून आरडाओरडा करत जवळपासच्या लोकांना बोलावून घेतले. मात्र, तत्पूर्वीच ही मुलगी मयत झालेली होती.
ढवळगावचे माजी उपसरपंच गणेश ढवळे त्या ठिकाणी आले होते. त्यानंतर घरात बारकाईने पाहिले असता मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी दोन पानांवर तिच्यावर कोणत्या व्यक्तींनी, कशा प्रकारे अन्याय केला याबाबत स्पष्ट उल्लेख असलेली चिठ्ठी लिहून ठेवल्याचे समोर आले. बलात्काराची केस दाखल करतानाही कशा प्रकारे अडचणी आल्या, याबाबतचाही स्पष्ट उल्लेख या चिठ्ठीत केलेला असल्याचे पीडितेच्या आईने सांगितले. गुन्हा रात्री उशिरा दाखल झाल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात पिडीत मुलीवर नातलगाच्या उपस्थितीत अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिच्या आई वडीलासह नातलगांनी फोडलेला हंबरड्याने उपस्थित हेलावुन गेले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाटे साहेब हे करत आहेत.