सोनदरा गुरुकुलचे सर्वेसर्वा सुदाम काका भोंडवे यांच्या गाडीला अपघात
आष्टी,दि.२२ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – सोनदरा गुरुकुल डोमरी परिवाराचे सचिव सुदाम काका भोंडवे, त्यांच्या पत्नी सिंधू ताई, नात कु.आनंदी अश्विन भोंडवे व स्नुषा सौ.कार्तिकी अश्विन भोंडवे यांच्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी कळताच मुंबईच्या दिशेने निघालेले आ.सुरेश धस यांनी तात्काळ माघारी येत घटनास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांनी सदर घटनेची स्थानिकांकडून माहिती घेतली. सोनदरा गुरुकुलचे सर्वेसर्वा सुदाम काका भोंडवे यांच्या गाडीला अपघात झाला. दुर्दैवी घटनेत सुदामकाका,पत्नी आणि कुटूंबातील दोघांचे निधन झाले.
आ.सुरेश आण्णा धस मुंबईला जात होते. सदर माहिती मिळताच रस्त्यातून परत फिरून शिरूर (घोडनदी) हॉस्पिटलमध्ये भेट देत डॉक्टर यांच्याशी चर्चा करून मयतावर शवविच्छेदन तसेच पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून पंचनामा व इतर बाबीची माहिती घेत सहकार्य करण्याची विनंती केली. सुदाम काकांचा मुलगा अश्विन हा गंभीर जखमी असुन तो उपचार घेत असलेल्या कारेगाव येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये भेट दिली. डॉक्टरांसोबत आ.सुरेश आण्णा धस यांनी अश्विनच्या उपचाराबाबत चर्चा केली. आण्णांनी दोनच दिवसांपूर्वी भोंडवे कुटुंबासोबत गुरुकुलमध्ये पालक मेळाव्यास उपस्थित राहुन अर्धा दिवस त्यांच्यासोबत घालवला होता. अचानक घडलेल्या या धक्कादायक अपघाती घटनेमुळे आ.धस भावुक झालेले पाहायला मिळाले.
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मनाला चटका लावणारी असल्याचे सांगत त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत १९८६ साली विलक्षण ध्येय प्रेरित झालेल्या सुदामकाकांनी आपली शेतजमीन अर्पण करून गुरुकूल सुरू केले. १९९७ साली जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना कार्यक्रम प्रसंगी सुदामकाकांशी संपर्क आला, तो आज पर्यंत कायम होता. भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या गोंडा ते बीड या उपक्रमामुळे.
तत्कालीन काळातच स्व.बबनराव देशपांडे, स्व. नाना मुंगीकर यांच्या समवेत सुदामकाकांच्या या महान कार्या विषयी चर्चा होत असे. अगदी तीन दिवसांपूर्वीच सुदाम काकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी डोमरी येथे गेलो होतो असे म्हणत अनेक जुन्या आठवणींना त्यांनी या प्रसंगी उजाळा दिला. तसेच सुदाम काका भोंडवे आणि डोंगरी चे गुरुकुल यांचे अतूट नाते होते. गोरगरीब मुलांना राष्ट्रभक्तीचे धडे देऊन शासकीय अनुदानाविना भारत देशाला घडवण्याचा वसा घेतलेल्या सुदाम काका यांच्या कुटुंबीयांचा अशाप्रकारे अंत व्हावा हे अत्यंत धक्कादायक असल्याचे सांगत नियतीच्या संकेता पुढे आपण कोण..? जगनियंत्याच्या इच्छेपुढे आपले काहीही चालणार नाही असे म्हणत आ.धस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.