अहमदनगर,दि.१६ मे,(प्रतिनिधी) – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर १६ आमदारांच्या अपत्रातेचा निर्णय विधानसभाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लवकरात लवकर घ्यावा यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आग्रही मागणी करत आहेस. तसेच अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप करून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केला आहे. यामुळे आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून आणखी राजकारण तापण्याची चिन्ह आहेत.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे नेते, राज्यसभा सदस्य संजय राऊत हे महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री तसेच शिवसनेच्या आमदारांबद्दल अतिशय वाईट शब्दांत टीका करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार हे घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचा कांगावा राऊत हे गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. आता अतिशय खालच्या पातळीवर जाऊन राऊत हे सन्माननीय विधानसभा अध्यक्षांवर बिनबुडाचे आणि बेताल आरोप करत आहेत, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्ष हे विधानमंडळ आणि विधानसभा सचिवालयाचे प्रमुख, पीठासीन अधिकारी असतात. विधानसभा अध्यक्षांना घटना, कार्यपद्धती, नियम आणि संसदीय परंपरांच्या अंतर्गत अधिकार आहेत. कायदेमंडळाच्या अध्यक्ष या नात्याने विधानसभा अध्यक्ष हे न्यायाधीशांच्या भूमिकेत असतात. विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात देखील आव्हान देता येत नाही, इतके अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिलेले असतात. अशा परिस्थितीत विधानसभेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त व्यक्तीवर खासदार संजय राऊत यांच्याकडून होत असलेले आरोप गंभीर आहोत, असं शिरसाट यांनी नमूद केलं आहे.
त्यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांवर केले जाणारे आरोप हे त्यांना धमकावण्यासाठी केले जात आहेत. अध्यक्षपदाची मानहानी करत आहेत. राऊत यांच्याकडून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रयत्न होत असून तो हक्कभंग या प्रकारात मोडत असल्याची आमची धारणा आहे, असं पत्र संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे.