अहमदनगर,दि.६ मार्च,(प्रतिनिधी) – केडगाव येथे रंगलेल्या होम मिनिस्टर कार्यक्रमात स्त्री शक्तीचा जागर करुन महिलांच्या कलागुणांचा खेळ रंगला होता. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या होम मिनिस्टर व खेळ पैठणीचा सन्मान कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तळ्यात मळ्यात, फुगे फोडणे, प्रश्न उत्तर, उखाणे, नृत्य अशा सर्वच स्पर्धेत भरभरुन सहभाग नोंदवत केडगावच्या वहिणींनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवून भाऊजींच्या कल्पकतेला प्रचंड दाद दिली.
केडगावच्या सोनेवाडी चौक येथील प्रांगणात हा बहारदार कार्यक्रम ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला. महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा नगरसेविका लताताई शेळके यांच्या वतीने महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरेखाताई भानुदास कोतकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई जगताप, वैशाली कोतकर, उद्योजक सचिन (आबा) कोतकर, नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेविका आशाताई कराळे, सविताताई कराळे, पल्लवी जाधव, अनिता बेरड, बलभीम आप्पा शेळके, सुरज शेळके, गणेश ननावरे, सुनिल उमाप, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, गणेश सातपुते आदींसह केडगाव भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सुवर्णाताई जगताप म्हणाल्या की, महिला सतत कुटुंबात व्यस्त असतात, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगले व्यासपीठ निर्माण करून देण्यात आले. महिलांचा रंगलेला अभूतपूर्व सोहळ्याच्या नियोजनाचे त्यांनी कौतुक केले.
लताताई शेळके यांनी प्रास्ताविकात म्हणाल्या की, प्रत्येक महिलेमध्ये विविध सुप्त कलागुण असतात. पण संसाराच्या जबाबदार्या पेलविताना तिच्यामध्ये असलेले कलागुण कोमजतात. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आशाताई कराळे यांनी केडगावला संदीप कोतकर कार्यकर्तृत्व नेतृत्व मिळाले. त्यांच्या नेतृत्वाने केडगावला विकासाची दिशा मिळाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केडगावात प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. महिलांच्या विविध स्पधने होम मिनिस्टरचा कार्यक्रम रंगला होता. रंगलेला हा खेळ पैठणीचा कार्यक्रमात विविध स्पर्धेचा सामना करीत महिलांनी विविध मनोरंजनात्मक व कौशल्यपूर्ण खेळाचा आनंद लुटला. होम मिनिस्टरच्या मानकरी ठरलेल्या विजेत्या महिलेस सोन्याची नथ प्रथम पारितोषिक देण्यात आले. द्वितीय पारितोषिक चांदीचा करांडा, तर तृतीय क्रमांकाचे पैठणी पारितोषिक विजेत्या महिलांना देण्यात आले. याशिवाय विविध स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक भेट वस्तू देण्यात आल्या. संगीताच्या तालावर महिलांनी ठेका धरुन या कार्यक्रमाचा आनंद लुटला. भाऊजी क्रांती नाना मळेगावकर यांनी आपल्या आवाजाने व कल्पकतेने सर्वांना खिळवून ठेवले. महिला, युवती, वयस्क महिलांसह चिमुकल्या मुलींनी सुद्धा कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला.