अहमदनगर,दि.१ मार्च,(प्रतिनिधी) -सध्याच्या जीवनशैली मध्ये अनेक जण झोप न येण्याच्या त्रासाला सामोरे जात आहेत. मानसिक ताण तणाव, कामाचे टेन्शन, जेवण्याच्या अयोग्य सवयी तसेच मोबाईलचा अतिवापर या सर्व गोष्टींचा झोपेवर परिणाम होत आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठी चांगली झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी रोज 7-9 तासांची झोप घेण्याची शिफारसही तज्ञ करतात. मात्र अनेक वेळा काही शारीरिक, मानसिक आणि इतर कारणांमुळे लोकांना नीट झोप येत नाही किंवा त्यांना रात्री उशिरा झोप येते. चांगल्या झोपेसाठी काही टिप्स या ठिकाणी देत आहेत. जर तुम्हीही निद्रानाशाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.
गाढ झोपेसाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धतीमध्ये एकूण सात पायऱ्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल..
स्वतःला कम्फर्टेबल बनवणे – अगदी पहिली पायरी म्हणजे झोपायला जाताना स्वतःला आरामदायक म्हणजेच कम्फर्टेबल बनवणे आणि आरामदायी स्थितीत झोपण्याचा प्रयत्न करणे. –
चेहऱ्याला आराम देणे – आपल्या चेहऱ्यावर 40 पेक्षा जास्त स्नायू असतात जे आपल्या शरीराच्या इतर भागांना सिग्नल पाठवतात. चेहरा रिलॅक्स असेल तर शरीरालाही रिलॅक्स वाटेल.
खांदे सैल सोडणे – तिसऱ्या टप्प्यात तुम्हाला तुमचे खांदे मोकळे करावे लागतील. खांद्यांवरील तणाव शक्य तितका कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा. खांदे सैल सोडल्याने तुमच्या मानेलाही आराम मिळेल.
मान पूर्णपणे सैल सोडावी – चौथ्या टप्प्यात तुम्हाला तुमच्या मानेवरील ताण काढून टाकावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मान पूर्णपणे सैल सोडावी लागेल. यासाठी दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू श्वास सोडा. यामुळे उरलेला ताणही दूर होईल.
हात सैल सोडणे – दिवसभर काम केल्यामुळे हातांना सर्वाधिक काम करावे लागते, त्यामुळे जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा हातावरील ताण कमी करणे गरजेचे आहे.
पाय आरामात मोकळे सोडणे – सहाव्या टप्प्यात आपण आपल्या पायांनादेखील आरामदायक स्थितीत आणले पाहिजेत. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या वरच्या भागाचा जोर पूर्णपणे काढून टाकता, तेव्हा पाय देखील पूर्णपणे सैल सोडले पाहिजेत. जेव्हा तुमचे संपूर्ण शरीर शिथिल होते, तेव्हा तुम्हाला मेंदूकडे लक्ष द्यावे लागेल. 10 सेकंद काहीही विचार न करण्याचा प्रयत्न करा. कोणताही नकारात्मक विचार आला तर तो विसरण्याचा किंवा दूर करण्याचा प्रयत्न करा. काही विचार तुम्हाला जास्त त्रास देतात.