अहमदनगर,दि.१९ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी आय.टी. सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा उपाध्यक्ष आकाश बडेकर, तालुका युवक सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, प्रमोद जाधव, हेमंत खरे, देविदास गवळी, सचिन छजलाने आदी उपस्थित होते.
युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. शिवाजी महाराजांनी सर्वसामान्य रयतेला केंद्रबिंदू मानून राज्य कारभार केला. त्यांचे विचार व संस्काराने आदर्श राज्याचा उदय झाला. त्यांचे विचार व कार्य समाजाला दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे म्हणाले की, स्वराज्य सहजा-सहजी मिळाले नाही, स्वराज्यासाठी अठरा पगड जातीच्या मावळ्यांचा त्याग व बलिदान आहे. ही जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. महाराजांचे शौर्य, माणुसकी, रणनिती व प्रजेसाठी असणारे प्रेम प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.