अहमदनगर,दि.१९ जानेवारी,(प्रतिनिधी) – येथील पैलवान राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांना क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मिशन ओलंपिक गेम्स असोसिएशन इंडिया व राणी पुतळाबाई वुमन्स लॉ कॉलेज भोसरी (पुणे) यांच्या वतीने आघाव पाटील यांना खासदार संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
भोसरी (जि. पुणे) येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भोसरीचे आमदार महेश लांडगे, मिशन गेम्स ओलंपिक असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय साळुंखे, सरचिटणीस पै. अमोल साठे, राज्याध्यक्ष सागर पवार, सहसचिव विनोद शिंदे, निवड समिती प्रमुख पल्लवी शिंदे, सदस्य विशाल देसाई आदी उपस्थित होते.
पै. राजकुमार आघाव पाटील नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील असून, त्यांनी जागतिक कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा कास्य पदक पटकाविले आहे. त्यांच्या या क्रीडा क्षेत्रातील योगदान व कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती राजर्षी शाहू महाराज क्रीडा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.