अकोले,दि.१३ जानेवारी,(प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक भांगरे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांनी एसएमबीटी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. भांगरे यांच्या अकाली निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.
भांगरे यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना सायंकाळी शेंडी येथून एसएमबीटी हॉस्पिटलला हलविण्यात आले. मात्र, तेथे जाण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. हॉस्पिटल व्यवस्थापनाने या वृत्तास दुजोरा दिला. ही बातमी अकोले तालुक्यात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. भांगरे यांनी संघर्षातून आपले राजकारण उभे केले होते. ते कृषी पदवीधर होते. पाच विधानसभा निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यात त्यांनी निकराची लढत दिली. त्यांना मोठा जनाधारही होता. संयमी व सर्वांशी सलोख्याने वागणे हा त्यांचा स्वभाव होता.
अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक यासह अकोले पंचायत समितीचे सभापती, समाजकल्याण समितीचे सभापती अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली. आदिवासी बहुल अकोले तालुक्यात मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आदिवासी समाजाचे मोठे नेते मानले जाणारे अशोक भांगरे हे मात्र राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले.
विरोधकांची मोट बांधत त्यांनी विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका पार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळवून दिले. त्यामुळे अशोक भांगरे हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जात होते. नुकत्याच झालेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीत त्यांनी विजय मिळवत कारखान्याचे उपाध्यक्ष झाले होते. गुरुवारी त्यांना त्रास होऊ लागल्याने घोटी येथील एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशोक भांगरे यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आज शेंडी या मूळगावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.