आमी व दिशान ॲडस् यांचे संयुक्त आयोजन
अहमदनगर,दि.४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – केंद्र सरकारचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प नुकताच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी संसदेत सादर केला. सर्वसामान्यांपासून देशातील बड्या उद्योजकांपर्यंत प्रत्येकाचेच अर्थसंकल्पाकडे लक्ष असते. यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय गवसले, सरकारचे आर्थिक धोरण नेमके काय व भविष्यातील वाटचाल कशी असेल असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. या प्रश्नांची समर्पक उत्तरे थेट अभ्यासक, तज्ज्ञांकडून मिळण्यासाठी नगरमध्ये प्रथमच बजेटवर बोलू काही या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर असोसिएशन ऑफ मॅन्युकॅक्चरिंग इंडस्ट्रीज अर्थात आमी व दिशान ॲडव्हर्टायझिंगने संयुक्तपणे या परिसंवादासाठी पुढाकार घेतला आहे.
मंगळवार दि.7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एमआयडीसी येथील चिंतामणी आर्ट गॅलरीत हा परिसंवाद होईल.
या कार्यक्रमात सी.ए.,आयपी अजय मुथा हे प्रमुख वक्ते असून प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांची प्रमुख उपस्थिती राहील. आर्थिक तरतूदी, अर्थविश्वातील घडामोडी, देशाचे अर्थकारण याविषयी माहिती घेऊ इच्छिणारांना कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आमीचे सचिव दिलीप अकोलकर, खजिनदार सुमित लोढा व दिशान ॲडस्च्या संचालिका बबिता गांधी यांनी केले आहे. सी.ए.आयपी अजय मुथा हे सीए नगर शाखेचे माजी अध्यक्ष इन्सॉलव्हन्सी प्रोफेशनल आहेत. ते सन 2022-23 च्या अर्थसंकल्पाचे सर्वसामान्य, उद्योजक व देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनातून सविस्तर विवेचन करणार आहेत.
यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के हे सुध्दा मार्गदर्शन करणार आहेत. सर्वसामान्य नगरकर, व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक यांना अर्थसंकल्पाची सविस्तर माहिती व्हावी, जागरुकता निर्माण व्हावी तसेच महत्वाच्या समस्यांची उकल व्हावी या उद्देशाने हा परिसंवाद आयोजित करण्यात आल्याचे आमीचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया व दिशान ॲडव्हर्टायझिंगचे किशोर गांधी यांनी सांगितले. या अर्थपूर्ण बजेटवर बोलू काही परिसंवादास नगरकरांनी अवश्य उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.