अहमदनगर,दि.१३ जानेवारी,(प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर निवडणुकीच्या उमेदवारीवरुन तांबे कुटुंबियांनी घेतलेली भूमिका अनपेक्षित होती. या सर्व घडामोडींवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने जर सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचे ठरवले तर मी स्वागतच करेन. पण सत्यजित याच्या भाजपमध्ये येण्याची अहमदनगरमध्ये भाजपची ताकद वाढेल असे नाही, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
सगळ्या नेत्यांच्या हट्टामुळेच काँग्रेस पक्षाची अधोगती झाली आहे. काँग्रेसची राज्यात जी परिस्थिती आहे तीच देशातही परिस्थिती आहे. लोकांना काँग्रेस पक्षाकडून काहीही अपेक्षा राहिलेल्या नाही. सत्यजित तांबे यांची देखील अशीच मानसिकता असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा.
सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्याने भाजपची नगर जिल्ह्यामध्ये ताकद वाढेल असे नाही, कारण भाजप आधीच तिथे ताकदवान आहे. मात्र सत्यजित तांबे भाजपमध्ये आले तर संघटन मजबूत करण्यासाठी त्यांचा फायदा होईल. चांगले लोक पक्षात यावे यासाठी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. त्याचा फायदा पक्षाला होत असतो, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
सत्यजित तांबे यांनी विश्वासघात केल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र विश्वासघात कोणी केला हा सवाल नाना पटोलेंनी आधी बाळासाहेब थोरात यांना विचारावा. बाळासाहेब थोरात यांचे सत्यजित यांच्या या निर्णयाला समर्थन आहे का? यातच नाना पटोले यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल की विश्वासघात केला की नाही, असे देखील विखे पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपने जर सत्यजित यांना पाठिंबा द्यायचे ठरवले तर मी त्यांचे स्वागतच करेन. पक्षात कोणाला घ्यायचे याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. त्याला आमचा विरोध असण्याचे काही कारण नाही. असे देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटले आहे.