अहमदनगर,दि.४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – सत्यजित यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, माझ्याविरुद्ध मोठं राजकीय षडयंत्र रचण्यात आल्याचेही ते म्हणाले. आज म्हणजेच ४ जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एबी फॉर्म देताना प्रदेश काँग्रेसने औरंगाबाद आणि नागपूरचा एबी फॉर्म पाठवावा ही जाणीवपूर्वक केलेली चूक होती असा आरोपही तांबे यांनी यावेळी केला. तसेच, याबाबत पक्षश्रेष्टींकडून काय कारवाई होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपण पक्ष सोडलेला नाही, मात्र आमदार अपक्ष असल्याचे तांबे म्हणाले.
सत्यजित तांबे यांनी नाना पटोलेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी उघडपणे नाव घेणं टाळलं पण प्रदेशाध्यक्ष म्हणत नाना पटोलेच या कारस्थानामागे होते, असेही त्यांनी एकप्रकारे सांगून टाकले. मी काँग्रेस पक्षातून बाहेर पडावं, अशीच काहीजणांची इच्छा होती. मला आणि माझ्या कुटुंबाला थोरात आणि तांबे परिवाराला बदनाम करण्याचा हा डाव होता, असे सत्यजित यांनी म्हटले.
मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे, मला सर्वच पक्षांनी, सर्वच संघटनांनी पाठिंबा दिला. म्हणूनच मी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे, मी यापुढेही अपक्ष म्हणूनच काम करणार आहे. यापुढे मी सर्वच लोकांचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रश्न मांडणार आहे. सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षातील नेत्यांनाही मी गरजेनुसार भेटून काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. मी सर्वांचे आभार मानतो, काँग्रेसवाले १०० टक्के माझ्याच सोबत होते, असेही सत्यजित यांनी यावेळी म्हटले.