मुंबई,दि.३ सप्टेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरमधील एका डायलॉगची सध्या सर्वत्र चर्चा आहे. “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर”, हा डायलॉग ऐकून अनेकांना एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आठवण झाली. आता वानखेडेंनी एक्सवर (आधीचं ट्विटर) एक पोस्ट केली आहे. जवानच्या डायलॉगनंतर वानखेडेंनी केलेली पोस्ट लक्षवेधी ठरत आहे.
समीर वानखेडे एनसीबीचे विभागीय संचालक असताना २ ऑक्टोबर २०२१ रोजी शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू असल्याची टीप वानखेडेंना मिळाली होती. त्यानंतर वानखेडेंनी क्रूझवर धाड टाकत अनेकांना अटक केली. आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात होता. या कालावधीत शाहरुख खान अतिशय अस्वस्थ होता. मुलाच्या सुटकेसाठी त्यानं बरेच प्रयत्न केले.
जवानमधील शाहरुख खानच्या लूकची सर्वत्र चर्चा आहे. चित्रपटाचा ट्रेलर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. शाहरुखच्या तोंडी असलेला ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ डायलॉग ऐकताच अनेकांना समीर वानखेडेंची आठवण झाली. अनेकांनी या डायलॉगचा संबंध कॉर्डिलिया क्रूझवर वानखेडेंनी टाकलेल्या धाडीशी आणि त्या क्रूझवरुन अटक करण्यात आलेल्या आर्यन खानशी लावला.
शाहरुखच्या जवानच्या ट्रेलरमध्ये असलेल्या डायलॉगचा संबंध समीर वानखेडेंशी जोडण्यात आला. त्यानंतर आता वानखेडेंनी एक पोस्ट केली आहे. वानखेडेंनी निकोल लायन्सचं वैचारिक वाक्य शेअर केलं आहे. ‘मी आगीला मिठी मारलीय आणि मी जाळून टाकलेल्या प्रत्येक पुलाच्या राखेत नृत्य केलं आहे. मला तुमच्या कोणत्याच नरकाची भीती वाटत नाही,’ असं वानखेडेंनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. निकोल लायन्सचा हा विचार मला कायम प्रेरणा देतो, असंही वानखेडेंनी पोस्टच्या शेवटी नमूद केलं आहे.