सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी दिला अपघातमुक्त अहमदनगरचा संदेश
अहमदनगर,दि.१८ जानेवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर व बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी सामाजकार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत अहमदनगर शहरात विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात होते. भारतात दरवर्षी सरासरी दहा लाखहून अधिक अपघात होतात. त्यामध्ये अनेक प्रवासी मृत्युमुखी पडतात. अपघातांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षितता अभियान देशभर राबवण्यात येत आहे. त्यादृष्टीकोनातून अहमदनगर शहरात जनजागृती अभियान राबविले जात असून त्यामध्ये रस्ता अपघातांची कारणे, वाहतुकीचे नियम व घ्यावयाची काळजी या विषयावर नागरिकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून विविध सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. सदर प्रबोधन कार्यक्रमासाठी सुमारे सीएसआरडीच्या २०० हून अधिक विद्यार्थीनी आपला सहभाग नोंदविला.
सुरवातील सीएसआरडीच्या परिसरामधून या रॅलीची सुरवात करण्यात आली तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. जे.डी. कुलकर्णी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियान, वाहतूक सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक जबाबदारी, मानसिक व शारिरीक आरोग्य आदि विषयांबाबत प्रबोधन करणारे घोषवाक्य, माहिती पत्रके, माहिती पुस्तके नागरिकांना वितरीत करणात आली. यामाध्यमातून नागरिकांना वाहतूक सुरक्षा साक्षर करण्याचा प्रयत्न या अभियानाच्या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर डोंगरे, सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे, यांत्रिक अधिकारी उंडे साहेब, अभियंता सचिन चव्हाण, रोटरी मिटटाऊनचे अध्यक्ष सतीश शिगटे, सचिव तुषार देशमुख, संचालक मधुर बागायत, मार्लिन एलिशा आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला या रॅलीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असणारे श्री. जे.डी. कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, यावेळी ते म्हणाले कि, रस्ते अपघात हे देशापुढील मोठे आव्हान असून नागरिकांनी वाहतुक नियम पाळणे हे आपले आद्य कर्तव्य समजून सुरक्षितपने वाहने चालविल्यास अपघातांच्या संख्येत आमुलाग्र घट होऊ शकेल.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर डोंगरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, रस्ता सुरक्षा हे संबंधित विभागाचे कर्तव्य असले तरी सामाजिक पातळीवर लोकांची याबाबतीत जबाबदारी महत्वाची आहे, सामाजिकदृष्टया अपघाताचे हे गांभीर्य चिंतेत भर घालणारे असल्याने अधिकारी, कर्मचारी, विविध क्षेत्रातील जबाबदार नागरिकांचा सामाजप्रबोधनासाठी पुढाकार महत्वपूर्ण आहे. सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी जनजागृतीसाठी केलेले पथनाटय हे प्रभावी माध्यम म्हणून ठरू शकते अश्या उपक्रमाला सीएसआरडी सहयोग दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मागर्दर्शन करतांना सीएसआरडीचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत साक्षर करणे हे या अभियानाचा उद्देश असून समाजकार्यकर्त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप दिल्यास अपघातमुक्त अहमदनगर करता येईल. त्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियान हे फक्त एका दिवसापुरते मर्यादित असणार नसून वर्षभर या अभियाना अंतर्गत विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
सीएसआरडीच्या समाजकार्य विद्यार्थ्यांनी अहमदनगर शहराच्या मुख्य गर्दीच्या विविध ठिकाणी केलेले पथनाट्य अत्यंत प्रभावी ठरेले. नागरिकांनी रस्तावर थांबून विद्यार्थी देत असलेली माहिती समजून घेवून आत्मसात करण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्ती वाहतूक नियम न पाळत असल्याचे आढळून आले त्यांचे यावेळी समुपदेशन करण्यात आले. यापुढे जागृत राहून नेहमी सुरक्षितपणे वाहने चालवणार असल्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएसआरडी डॉ. सुरेश मुगुटमल यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सीएसआरडीचे डॉ.जेमोन वर्घीस, प्रा. विजय संसारे, प्रा. प्रदीप जारे, आसावरी झपके, सॅम्युअल वाघमारे, दीपक बनसोडे, श्रीकांत तळोकार यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.