अहमदनगर,दि.१४ एप्रिल,(प्रतिनिधी) – बोल्हेगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जीवनधारा प्रतिष्ठानच्या वतीने आंबेडकर चौक ते गणेश चौक व काकासाहेब म्हस्के रस्त्याची स्वखर्चाने स्वच्छता करण्यात आली. सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती-दगडे साचून, रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे-झुडपे वाढली होती. जयंती उत्सव उत्साहात साजरा होण्याच्या उद्देशाने जेसीबी व डंपरच्या सहाय्याने माती-दगडे व झाडे-झुडपे हटवून स्वच्छता करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल लगड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर चौक ते गणेश चौक व काकासाहेब म्हस्के रोड परिसराची स्वखर्चाने स्वच्छता करण्याची परवानगी महापालिकेकडे जीवनधारा प्रतिष्ठानने केली होती. त्याला महापालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने रस्त्याची स्वच्छता व लेवल करण्यात आली.
अमोल लगड म्हणाले की, जीवनधारा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम सातत्याने सुरु आहे. बाबासाहेबांच्या जयंतीला भीमसैनिकांचा उत्साह वाढविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून, रस्त्यावरील अडथळे हटविण्यात आले आहेत. या जयंती उत्सवात जीवनधारा प्रतिष्ठानही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.