कोपरगाव,दि.२६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – कोपरगावात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ग्रामीण रुग्णालयात अचानक भेट दिली. दरम्यान संबंधित अधिकारी ग्रामीण रुग्णालयात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता पोहोचले होते. यावेळी रुग्णालयातील परिचारिका व तेथील कर्मचाऱ्यांशी त्यांनी असभ्य वर्तन केल्याची तक्रार करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी ग्रामीण रुग्णालयात डाॅक्टर आणि इतर लोक कामावर हजर असतात कि नाही याची झाडाझडती घेत होते.
काल शनिवारी पहाटे पाच वाजेच्या दरम्यान सदर अधिकारी आपल्या ड्रायव्हरसह ग्रामीण रुग्णालयात पोहचले. ड्युटीवर हजर असणाऱ्या नर्सकडे हजेरीपत्रक मागितल्याचे त्या व्हिडीओत दिसत आहे. याचबरोबर सध्या या रुग्णालयात कोण डाॅक्टर हजर आहेत याची विचारपूस ते करत असल्याचे दिसत आहे. डाॅक्टर हजर नसल्याने त्यांनी डाॅक्टरला फोन लावायला सांगितला. येथे कामावर कोण डॉक्टर आहेत, अशी विचारणा केली. त्यांनी कोणी नाही म्हटल्यावर हजेरी रजिस्टरची मागणी केली.
सदर परिचारिकेने ते डॉक्टरांकडे असते. डॉक्टर नाही, तेथे हजेरी रजिस्टर नाही म्हटल्यावर त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी परीचारिकेस डॉक्टरांनाला फोन लावण्यास सांगितले. फोनवर त्यांनी डॉक्टरांना अर्वाच्च शिवीगाळ करून, मला हजेरी नोंद पुस्तिका दाखवा असे दरडावले, असे तेथील परिचारिका सांगत असल्याची व्हिडीओ क्लिप समाज माध्यमात पसरली आहे. यावेळी ते डाॅक्टरांना जाब विचारत असल्याचे देखील दिसत आहे. तुम्ही पगार कसला घेत आहात. ही सर्व घटना मोबाईल कॅमेर्यात कैद झालेली आहे. या दरम्यान चालक सदर कृतीचे फोनमध्ये चित्रीकरण करत असल्याची कल्पना आल्यानंतर त्यांनी तेथून काढता पाय काढल्याचे सांगण्यात येत आहे.