मुंबई, १० मे २०२३– आरसीबीला हारवत वानखेडेवर मुंबईचा दणक्यात विजय सूर्यकुमार यादवची ३५ चेंडूत ८३ धावांची धडाकेबाज खेळी त्याला नेहाल वडेराने दिलेली धावांची साथ आणि इशान किशनने केलेल्या ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने फाफ डू प्लेसिसच्या आरसीबीचा तब्बल २१ चेंडू आणि ६ विकेट्सने पराभव केला. या विजयासह मुंबईने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे.
दुसरीकडे आरसीबीचा प्ले-ऑफचा मार्ग अधिकच कठीण झाला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्ससमोर २०० धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने धमाकेदार सुरूवात केली आहे.
सलामीवर इशान किशन पहिल्या चेंडूपासूनच आरसीबीच्या गोलंदाजाच्या मागे लागला. इशान आणि रोहित शर्माने ४.४ षटकातच अर्धशतकी भागीदारी केली. इशान किशन आज चांगल्या लयीत दिसला. तो मोठी खेळी करेल, असं वाटत असताना वानिंदू हसरंगाने त्याला बाद केलं.
किशनने २१ चेंडूत ४२ धावांची धडाकेबाज खेळी केली. यामध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. किशननंतर हसरंगाने रोहित शर्माला सुद्धा बाद केलं. रोहितला केवळ ७ धावाच करता आल्या. दरम्यान, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वडेराने मुंबईचा डाव सावरला. दोघांनी सुरूवातीला सावध फलंदाजी केली.
मात्र, मैदानावर जम बसल्यानंतर दोघेही आरसीबीच्या गोलंदाजांवर तुटून पडले. सूर्याकुमार यादव तर वानखेडेवर चौकार आणि षटकारांची बरसात करत होता. त्याला वडेरा सुद्धा चांगली साथ देत होता. सूर्या आणि नेहालने तिसऱ्या विकेट्साठी तब्बल १४० धावांची भागीदारी केली. मुंबईला विजयासाठी अवघ्या ७ धावांची गरज असताना सूर्यकुमार यादव बाद झाला.
त्याने ५३ चेंडूत ८३ धावांची विस्फोटक खेळी केली. त्याला विजयकुमारने बाद केल आहे. सूर्या बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर कॅमरून ग्रीन बाद झाला. मात्र, नेहाल वडेराने षटकार ठोकत मुंबईला सामना जिंकून दिला.