अहमदनगर,दि.१३ मार्च,(प्रतिनिधी) – जुनी पेन्शनसह विविध प्रमुख मागण्यांसाठी नागपूर ते मुंबई मंत्रालयावर निघालेल्या कास्ट्राईबच्या पेन्शन महादिंडीचे शहरात स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषद व इतर सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारींनी महादिंडीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन शहरातून मोटारसायकल रॅली काढली होती. जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महादिंडीचे स्वागत करण्यात आले. कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली पेन्शन महादिंडी निघाली असून, यावेळी कास्ट्राईब महासंघाचे राज्याचे अतिरिक्त महासचिव हर्षल काकडे, कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वाघचौरे, पेन्शन हक्क संघटनेचे राजेंद्र ठोकळ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सुभाष कराळे, अभय गट, जिल्हा परिषद लेखा कर्मचारी संघटनेचे विलासराव वाघ, आरोग्य संघटनेचे मनोहर डिसले, संदिप वाघमारे, पर्यवेक्षिका अर्चना एकंडे, मीना काळेकर, शोभा एक्कल, सुजाता वाघचौरे, प्रणिता बारवकर, रंजना कार्ले, शशिकला लोखंडे, सुनीता बिडवे, शोभा इरकल आदींसह जिल्हा परिषद, सरकारी कर्मचारी व शिक्षक शिक्षकेतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कास्ट्राईबचे राज्याध्यक्ष अरुण गाडे म्हणाले की, जुनी पेन्शनबाबत विधी मंडळाच्या अधिवेशनापूर्वी हा निर्णय घ्यावा. उपमुख्यमंत्री प्रत्येक वेळी जुनी पेन्शनबाबत भाषा बदलत आहे. कर्मचारींना फसविण्याचे तंत्र सुरु आहे. देशातील पाच राज्यात जुनी पेन्शन सुरु असून, महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन देण्याची गरज आहे. आर्थिक नियोजन केल्यास जुनी पेन्शनचा मुद्दा निकाली निघणार आहे. जुनी पेन्शनवर निर्णय न झाल्यास 14 मार्चच्या बेमुदत संपात कास्ट्राईब एकजुटीने सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पदोन्नती व आरक्षणचा प्रश्न देखील तातडीने मार्गी लावण्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज येथून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत एकच मिशन, जुनी पेन्शनचे फलक व टोप्या घालून कर्मचारी सहभागी झाले होते. कर्मचारींनी रॅलीत जोरदार घोषणाबाजी केली. माळीवाडा येथील महात्मा फुले व मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरातील प्रमुख मार्गावरुन निघालेल्या मोटार सायकल रॅलीचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप झाला. यावेळी झालेल्या द्वार सभेत उपस्थितांनी आपल्या भाषणात सरकार विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला. आभार चंद्रकांत वाकचौरे यांनी मानले. जुनी पेन्शन, पदोन्नतीला आरक्षण, कंत्राटी कर्मचार्यांचे न्याय हक्क, अंगणवाडी सेविका-आशा वर्कर यांना शासकीय दर्जा, मानधनात वाढ, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, 4.80 लाख रिक्त पदे भरणे व इतर मागण्यांसाठी कास्ट्राईबची महादिंडी मंत्रालयावर 14 मार्च रोजी धडकणार आहे.