अहमदनगर,दि.२ जानेवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर नामांतरणाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहमदनगरच्या नामांतराबाबत शासनदरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी, भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. त्यांच्या मागणीनंतर सरकारने नामांतराच्या हालचाली सुरू केल्या असून तसे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती समोर येत आहे.
त्यानुसार अहमदनगर महानगरपालिकेच्या महासभेत ठराव घेऊन त्याची प्रत महानगरपालिकेकडून मागवली आहे. अहमदनगरचे नामकरण करण्याची स्थानिक नेते किंवा कुणाचीही मागणी नसल्याने राज्यकर्त्यांमध्येही संमिश्र प्रतिक्रिया आहेत. सर्वप्रथम अहमदनगर जिल्ह्याचे नाव अंबिका नगर करण्याची मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद येथे केली होती. ती मागणी आजही शिवसेना मांडत आहे.
त्यानंतर भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची मागणी विधिमंडळात केली आहे. त्यांच्या मागणीला सरकार सकारात्मक असल्याचं दिसत आहे. विधान परिषदेमध्ये नामांतराबाबत सरकारची भूमिका काय? याबाबत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता. त्यावर मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर दिले. अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असून या संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेला पत्र देण्यात आले आहे.
नामांतराबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी स्पष्ट भूमिका घेतली असली तरी इतर पक्षांनी यावर सावध पवित्रा घेतला आहे. याबाबत ठरावाची प्रत मागवल्याने महासभा बोलावली जाणार का? या ठरावला स्थानिक नगरसेवक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. मात्र, नामांतराच्या मागणीवर शासन स्तरावरून प्रथमच हालचाली सुरू झाल्याने या मुद्द्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.