अहमदनगर,दि.२१ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्ह्याचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ नामकरण करण्यासाठी नामांतर कृती समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या नामांतर रथ यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कोल्हापुर येथील पट्टमकोडवली येथील पुजारी नारायण खाणू मोठे देसाई, कृती समितीचे विजय तमनर, राजेंद्र तागड, काका शेळके, निशांत दातीर, विनोद पाचारणे, अॅड.अक्षय भांड, ज्ञानेश्वर बाचकर, अशोक कोळेकर, अण्णासाहेब बाचकर, शारदा ढवण, दत्तात्रय खेडेकर, अशोक विरकर, राजेंद्र पाचे, डि.आर.शेंडगे, अशोक होनमाने, भगवान जर्हाड, बाबासाहेब तागड, सचिन डफळ आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,नागपूर हिवाळी अधिवेशनात आ.गोपीचंद पडळकर, आ.राम शिंदे, माजी मंत्री महादेव जानकर यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर’ करणेबाबत मागणी केली होती. त्यावेळेस या मागणीला उत्तर देतांना राज्याचे मंत्री दिपक केसकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर सरकार या नावासाठी अनुकूल आहे, असे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही सकारात्मकता दर्शविली आहे.
त्यानुसार राज्य शासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, पोस्ट ऑफिस, रेल्वे विभाग, सुरक्षा विभाग आदि विभागांना पत्र पाठवून प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना देण्यात आला. परंतु पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे पाठविण्यात आलेला नाही. यासाठी नामांतरण कृती समितीच्यावतीने 9 फेब्रुवारी 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव चौंडी येथून नामांतर रथयात्रा सुरु करण्यात आली होती. या रथयात्रेच्या माध्यमातून 14 तालुक्यांमध्ये जावून अनेक ग्रामपंचायतींचे ठराव, नगरपालिका ठराव, सामाजिक संघटांनाचा पाठिंबा उत्स्फुर्तपणे या समितीला मिळालेला आहे. या नावाची मागणी लोकाभिमुख होत आहे. तरी या प्रश्नी आपण स्वत: लक्ष घालून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी मोर्चेकर्यांच्यावतीने प्राथमिक स्वरुपात भक्ती तमनर, आदिती पाचारणे, शोभा दातीर, श्रृतीका तमनर, पुजा ढवण, दिव्या ढवण आदि महिलांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले.
यावेळी नाराणय खाणू मोठे देसाई म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगांव असलेल्या व देशभर आपल्या कार्याने नावारुपास आलेल्या अहिल्याबाईंचे नाव नगर जिल्ह्यास दिल्यास हा खर्या अर्थाने त्यांच्या कार्याचा उचित गौरव होणार आहे. या नामांतराच्या लढ्यातील पहिले पाऊल पडले असून, या पुढील काळात अधिवशेनावर समाज बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. नामांतराच्या लढ्याला व्यापक स्वरुप देण्यासाठी राज्य पातळीवरील समाज बांधवांचे लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. हा लढा नामांतरापर्यंत पेटवत ठेवण्याचे महत्वाची जबाबदारी नगर जिल्ह्यावर असल्याचे सांगितले.