पुणे,दि.१६ जानेवारी,(प्रतिनिधी) – केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते जी-२० परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं होतं. जी-२० परिषदेच्या उद्घाटनानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधत देशात जूननंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता वर्तवली आहे. नारायण राणे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर भारताचं टेन्शन वाढलं आहे. नागरिकांना आणि देशाला मंदीची झोळ पोहोचू नये, यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नियोजन केलं जात असल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत प्रगती करत आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कमालीची वाढ होत आहे. ८ वर्षांपूर्वी आपला देश जिडीपीच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर होता. आता आपण ५ व्या क्रमांकावर असून येत्या १० वर्षात आपण तिसऱ्या क्रमांकावर जाऊ. हे सगळं मोदींच्या धोरणामुळे शक्य झाले आहे, असं म्हणत मोदींच्या नेतृत्त्वाचे राणेंनी कौतुक केले.
महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सर्व प्रकारचे विषय कॅबिनेटमध्ये येतात. आपल्या नेत्यांच्या बुद्धिमत्ता कमी लेखणे चुकीचे आहे. सरकार बदललं म्हणून निर्णय बदलतात असं नाही. एखादा निर्णय पोषक नसेल तर तो बदलला जातो, सरकार बदललं की दृष्टीकोन बदलतो. सरकार बदलल्यामुळे उद्योग बाहेर गेले असे होत नाही. आपल्याकडे गुंतवणूक व्हावी म्हणून उद्योग आणले जातात, असं राणे म्हणाले.