अहमदनगर,दि.१९ जानेवारी,(प्रतिनिधी) – दृष्टीदोष असलेल्या गरजूंसाठी शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांच्या वाढदिवसानिमित्त केडगाव येथे सोमवारी (दि.23 जानेवारी) मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. साधू वासवानी मिशन संचलित बुधराणी हॉस्पिटल (पुणे) व केडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव येथे येथील केडगाव जिल्हा परिषद शाळेसमोर अंबिका बस स्टॉप समोर हे शिबिर होणार आहे. या शिबिराचा सर्व गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन नगरसेविका तथा स्थायी समितीच्या सदस्या गौरीताई ननावरे व सामाजिक कार्यकर्ते गणेश ननावरे यांनी केले आहे.
आमदार संग्राम जगताप, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, सचिन कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी तज्ञ डॉक्टर मंडळी करणार आहेत. तर मोतीबिंदू, काचबिंदू असलेल्या रुग्णांना तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे पाठविण्यात येणार आहे. नगर ते पुणे जाण्याचा, येण्याचा प्रवास व शस्त्रक्रियेचा खर्च मोफत राहणार आहे. बिन टाक्याचे ऑपरेशन केले जाणार असून, रुग्णांसाठी राहणे व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबीरार्थींना नंबरचे चष्मे देखील कार्यक्रम स्थळी मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक राहुल कांबळे, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती लताताई शेळके, नगरसेवक मनोज कोतकर, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, प्रयत्नशील आहेत. शिबिरात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नाव नोंदणीसाठी मनीष ननावरे 9270251515, श्यामशेठ कोतकर 9225555599 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.