बच्चे कंपनीला मिळणार झुकझुक गाडीच्या कार्याची रंजक माहिती
अहमदनगर,दि.३० एप्रिल,(प्रतिनिधी) – उन्हाळ्याची सुटी लागताच बच्चे कंपनीला झुकझुक गाडीतून मामाच्या गावाला जायचे वेध लागतात. रेल्वे प्रवास, रेल्वेचे कार्य याविषयी लहानांबरोबरच मोठ्यांनाही उत्सुकता असते. पुण्यातील रेल्वे मॉडेल संग्राहक सुहास दिक्षित यांनी आपल्या छंदातून भारतीय रेल्वेचे संपूर्ण कार्य व ओळख दर्शवणारे आकर्षक मॉडेल तयार केले असून ते ६ ते ७ मे दरम्यान नगरकरांना कोहिनूर मॉल येथे पहायला मिळणार आहे. उन्हाळ्याच्या सुटीत ही मुलांसाठी मोठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती अश्विन गांधी यांनी दिली.
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वाधिक प्रवासी व मालवाहतूक करणारी रेल्वे आहे. कोळशावरील इंजिन, डिझेल इंजिन, इलेक्ट्रिक इंजिन पर्यंत रेल्वेचा प्रवास झाला आहे. रेल्वे स्टेशन, रेल्वेची अंतर्गत संपर्क यंत्रणा, ट्रॅफिक कंट्रोल, जुन्या काळातील यंत्रणा, आधुनिक संगणकीकृत व्यवस्था, रेल्वे स्टेशनवरील उद्घोषणा, पुणे मुंबई धावणारी डेक्कन क्वीन, बोगद्यातून होणारा रेल्वेचा प्रवास, मालवाहतूक करणाऱ्या रेल्वे अशा अनेक गोष्टी या मॉडेल मध्ये आहे. रेल्वेचे कार्य सांगणारी ध्वनिफित असल्याने प्रत्येकालाच एवढ्या प्रचंड यंत्रणेची वेगळी ओळख होते.
रेल्वेची नियमावली, रेल्वे क्रॉसिंगवरील काम, लहान मोठ्या पुलावरून धावणारी रेल्वे याचीही सविस्तर माहिती अतिशय रंजक पद्धतीने सर्वांना मिळणार आहेत. सदर रेल्वे मॉडेल प्रदर्शन सकाळी ११ पासून कोहिनूर मॉलमध्ये असणार आहे. नगरकरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.