अहमदनगर,दि.१५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.15 फेब्रुवारी) महापालिकेत झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत केडगावच्या पाणीपट्टी दरात वाढ करण्यास भाजपच्या नगरसेविका गौरीताई गणेश ननावरे व नगरसेवक राहुल कांबळे यांनी विरोध दर्शविला आहे. सभेतील विषय क्रमांक 164 ला विरोध दर्शविणारे लेखी पत्र दोन्ही नगरसेवकांनी उपायुक्त यशवंत डांगे यांना दिले.
अहमदनगर महानगरपालिकेची पाणीपुरवठा योजना स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने घरगुती वापर पाणीपट्टीचे दरात वाढ करण्याबाबतचा विषय क्रमांक 164 घेण्यात आला होता. सध्या केडगाव उपनगरमध्ये तीन ते चार दिवसानंतर पाणीपुरवठा होतो. तोही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामध्ये या उपनगरातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. केडगाव परिसरातील नागरिक नियमितपणे कर भरित असून देखील त्यांच्यावर कायम अन्याय झाला असल्याचे पत्रात म्हंटले आहे.
केडगाव परिसरातील नागरिकांच्या पाणीपट्टीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येऊ नये, तर सध्या आकारण्यात येणारी पाणीपट्टी रक्कम दीड हजार रुपया पेक्षा कमी करून 750 इतकीच पाणीपट्टी आकारण्याची मागणी नगरसेविका ननावरे व नगरसेवक कांबळे यांनी केली आहे.