अहमदनगर,दि.२४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. केडगाव बायपास येथील एका हाॅटेल समोरील एका बंद ढाब्याजवळ एका ४० वर्षीय व्यक्तीची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. केडगाव बायपास येथील एका बंद धाब्यावर मित्रासोबत दारू पिण्यासाठी बसलेल्या एकाची अज्ञात चोरट्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. सदर घटना गुरूवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे.
शिवाजी किसन उर्फ देवा होले (रा. जाधव पेट्रोल पंपाजवळ कल्याण रोड) असे मयताचे नाव आहे. याबाबत अरुण नाथा शिंदे (रा. नेप्ती )यांनी फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे. केडगाव येथील बायपास रोडवरील हॉटेल के नाईन जवळ कराळे यांच्या बंद धाब्यावर शिवाजी होले व त्यांचा मित्र अरुण नाथा शिंदे हे दोघे दारू पीत बसले होते.त्यावेळी तिथे आणखी दोघेजण आले व त्यांनी आम्ही इथे दारू पिऊ का, अशी विचारणा केली. त्यावर होले व शिंदे यांना त्या दोघांना दारू पिण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार दोन्ही चोरटे काही वेळ दारू पिले. नंतर ते दोघेही तेथून निघून गेले. काही वेळाने अज्ञात चोरट्यांसह आणखी दोघेजणे तिथे आले व चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी करू लागले. इतक्यात होले यांनी तुम्ही आम्हाला नडता का असे म्हणत त्यांनी रस्त्याकडे फळ काढला. इतक्यात तोंडाला रुमाल बांधलेल्या एका इसमाने पिस्टल काढून होले यांच्यावर गोळी झाडली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर शिंदे यांनाही चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे काढून घेण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र शिंदे यांनी प्रतिकार केल्याने चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून तीन हजार रुपये व मोबाईल, असा ऐवज घेऊन पसार झाले, असे शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.