अहमदनगर,दि.१४ जानेवारी,(प्रतिनिधी) – मकर संक्रांतनिमित्त पंतगबाजीचा आनंद अनाथ व दुर्बल घटकातील मुलांना घेता यावा या भावनेने सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील मुलांना पतंग व चक्रीची भेट दिली आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत युवक-युवतींनी हा उपक्रम राबविला आहे.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चायना (नायलॉन) मांजा न वापरण्याचे आवाहन करुन त्याचे होणारे दुष्परिणाम सांगितले. तर वंचित घटकातील मुलांसह सांदिपनी अकॅडमीच्या युवक-युवतींनी पंतगोत्सवाचा आनंद देखील लुटला. अकॅडमीचे व्यवस्थापकीय संचालक के. बालराजू यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अकॅडमीचे प्रा. नानासाहेब बारहाते, प्रा. अमित पुरोहित, प्रा. मनिष कुमार, राहुल गुजराल, बालघर प्रकल्पाचे युवराज गुंड आदी उपस्थित होते.
बालघर प्रकल्पात मोठ्या संख्येने अनाथ व दुर्बल घटकातील मुले शिक्षणासाठी वास्तव्यास आहे. दिवाळीतही अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या वंचित घटकातील मुलांसह दिवाळी साजरी करुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला होता. तर या मकर संक्रातनिमित्त मिळालेल्या पंतग-मांजा चक्रीच्या भेटीने बालघर प्रकल्पातील विद्यार्थी भारावले. यावेळी रंगलेल्या पंतग महोत्सवाचा बालकांनी मनमुराद आनंद लुटला आहे.
के. बालराजू म्हणाले की, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता संस्कार देखील रुजवले जात आहे. वंचितांच्या जीवनात आनंद फुलवून वंचित समूहाच्या मुलांना समाजाच्या प्रवाहात आनण्यासाठी सांदिपनी अकॅडमी योगदान देत आहे.