अहमदनगर,दि.३ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – आक्षेपार्ह शब्दांत साईबाबांची बदनामी करणाऱ्या व्यक्तींविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका यूट्यूब चॅनलवर गिरिधर स्वामी याने एका धार्मिक कार्यक्रमात अत्यंत घाणेरड्या भाषेत वक्तव्य केलं. जाती-धर्मात तेढ निर्माण होईल अशा स्वरुपाचं वक्तव्य केल्याने शिर्डी येथील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी गिरीधर स्वामी व इतर दोन व्यक्तींविरुद्ध शिर्डी पोलिसात तक्रार दिल्यानंतर आता सर्वांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.
शिर्डीचे माजी नगराध्यक्ष व साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशज शिवाजी गोंदकर यांनी याप्रकरणी गिरधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा (हैदराबाद) यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे़. सायंकाळी उशिरा शिर्डी पोलिस ठाण्यात आरोपी गिरधर स्वामी व हिरालाल श्रीनिवास काबरा (हैदराबाद) यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे व धर्मा-धर्मांत तेढ निर्माण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
३१ जानेवारीला दुपारी शिवाजी गोंदकर यांनी यू-ट्युबवर गिरधर स्वामी याने प्रसारित केलेला एक व्हिडीओ बघितला़ यात व्यक्तीने साईबाबांविषयी आक्षेपार्ह शब्दांत माहिती सांगितली होती. गोंदकर यांनी ही बाब तत्काळ शिर्डीचे आमदार व राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर महसूलमंत्री विखे यांच्या सूचनेनुसार गोंदकर यांनी तातडीने संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
गिरीधर स्वामीने साईबाबांबाबत जी काही विधानं केली आहेत त्याला कुठेही आधार नाही. गिरीधर स्वामींकडून साईबाबांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. केवळ पैसे कमावण्याच्या हेतूने सोशल मीडियात साईबाबांबद्दल खोटी व बदनामीकारक विधाने केली जात आहेत. म्हणून मी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये गिरीधर स्वामी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, शिर्डीत या प्रकरणी प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच आता गिरीधर स्वामीविरुद्ध नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.