Homeक्राईमपुणे मार्केटयार्ड परिसरातील तिघांच्या अपहरणाचे नगर कनेक्शन

पुणे मार्केटयार्ड परिसरातील तिघांच्या अपहरणाचे नगर कनेक्शन

श्रीगोंदा,दि.१५ जानेवारी,(प्रतिनिधी) – पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरातून तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. या अपहरण नाट्याला आता वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. अपहरण झालेल्या व्यक्तींची सुटका करण्यात आली असून अपहणकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचा सरपंच असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या मुख्य आरोपी हा फरार असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

अपहरण करण्यात आलेल्या व्यक्तींकडे आरोपी सरपंचाने काळे पैसे पांढरे करण्यासाठी ३४ लाख रूपये दिले होते. पिडीत व्यक्तींनी ते पैसे प्रोसेसिंग फी आणि टोकन अमाऊंटच्या नावाखाली घेतले होते. सरपंचाला एकूण १० कोटी रूपये व्हाईट करून हवे होते. मात्र ठरल्याप्रमाणे पिडीत व्यकींनी सरपंचाला ब्लॅक मनीचे व्हाईट पैसे करून दिले नाहीत. त्यावर सरपंचाला पिडीत व्यक्तींवर संशय आला. त्यातुनच तीन व्यक्तींचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ५ पथकांनी तांत्रिक विश्लेषण व अहमदनगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने तिघांना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथून एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रवीण शिर्के, विजय खराडे, विशाल मदने (तिघेही रा. नगर) यांचा समावेश आहे. तर इतर साथीदार फरार असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. शुक्रवारी (दि.१३) मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तिघा संशयित आरोपी व त्यांच्या सहा ते सात साथीदारांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तींपैकी एकाच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण व्यक्तींमधील एकजण फिर्यादीचा भाऊ आहे. फिर्यादी मुळचे साकीनाका, मुंबई येथील रहिवासी असून तेथील एका कंपनीत प्रतिनिधी म्हणून ते काम करतात. इतर दोघांमध्ये एक नातेवाईक तर दुसरा त्यांचा मित्र आहे. कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात आले होते. 12 वाजण्याच्या सुमारास 12 वाजण्याच्या सुमारास 2 चारचाकी गाड्यांमधून वास्तुश्री कॉम्पलेक्स समोरून या तिघांचे अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान, अपहरणकर्त्यापैकी एकाने व्हॉट्सऍपवर व्हिडीओ कॉल करत कंपनी प्रतिनिधी असणाऱ्या प्रमुख अपहरण व्यक्तीच्या भावाला फोन करून या तिघांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती दिली.
तसेच यादरम्यान त्यांना मारहाण करत असल्याचे देखील दाखवले.
जर या तिघांना सोडवायचे असेल तर पुण्यातील एम.जी रस्त्यावरील अंगडीयाकडे ५० लाख रूपये खंडणी देण्याची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. त्यानंतर अपर्हत व्यक्तीच्या भावाने यासंबंधीची फिर्याद शुक्रवार (दि.१३) मार्केटयार्ड पोलीसांना दिली.

अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने ५ पथके तयार
करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. प्रत्येकाला विभागून काम देण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने नगर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

आरोपींच्या ताब्यातून एक फॉर्च्युनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे,
नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, सुनिल पंधरकर, क्रांतीकुमार पाटील, अजय वाघमारे, उपनिरीक्षक मोहन जाधव, सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, पोलिस अंमलदार शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सैदोबा भोजराज, चेतन आपटे, विनोद साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!