अहमदनगर,दि.१६ एप्रिल,(प्रतिनिधी) – शहरातील कापड बाजारासह परिसरातील अतिक्रमण महापालिकेने रविवारी पोलिस बंदोबस्तात हटविले. अनधिकृत टपऱ्या, शेड, हातगाड्या, रस्त्यावरील ताडपत्र्या, दुकानांसमोरील स्टॅण्ड असे सर्व काही पथकाने काढून टाकत बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते मोकळे केले आहेत.अतिक्रमण विरोधातील ही मोहिम अशीच कामय राहणार असल्याचे यावेळी मनपाचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी कापड बाजारातील व्यापाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर रविवारी व्यापारी असोसिएशनचे आक्रमक पवित्रा घेतला. कापड बाजारासह शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार, घास गल्ली आदी ठिकाणचे अतिक्रमण काढून टाका, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. खासदार सुजय विखे यांनी व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शनिवारी तत्काळ महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला.
शनिवारी दुपारी पाऊस सुरू झाल्याने अतिक्रमण काढण्यास व्यत्यय आला होता. त्यामुळे मनपाचे पथकाने रविवारी सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. कापड बाजारातील शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार, घासगल्ली आदी परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. मनाच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.