अहमदनगर,दि.२७ जानेवारी,(प्रतिनिधी) – लिओग्राफी म्हणजे उलट्या अक्षरात मिरर इमेज मध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी लिहून नगरमधील सौ.क्रांती नित्यानंद नाईक यांनी अनोखा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया, अहमदाबाद या बुक मध्ये होणार आहे. तसेच या संस्थेचे अध्यक्ष पवन सोलंकी यांच्या हस्ते दिनांक २८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या विक्रमाच्या नोंदणी प्रमाण पत्राचे वितरण करण्यास येणार आहे अशी माहिती अजिंक्य नाईक व आकांक्षा नाईक यांनी दिली आहे. हा कार्यक्रम एल एन्ड टी म्हणजेच श्न्यायडर इलेक्ट्रिक ऑफिसर्स रिक्रिएशन क्लब मध्ये पार पडणार आहे.
सौ. क्रांती नाईक या आर्मी स्कूल मध्ये होम सायन्सच्या शिक्षीका होत्या. सौ. क्रांती नाईक या गृहिणी असून फावल्या वेळात काय करायचे या उद्देशाने त्यांनी या कलेला प्रोत्साहन दिले. अगोदर त्या उलट्या अक्षरात हाताला लागेल ते साहित्य लिहीत होत्या. पण मग याचे मोठे काहीतरी करावे या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला आणि सप्टेंबर महिन्याच्या २२ तारखेपासून त्यांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ उलट्या अक्षरात लिहिण्यासाठी घेतला आणि तो अवघ्या १०० दिवसात संपूर्ण लिहून पूर्ण केला. हा एक विक्रम आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर आणि अशा प्रकारे कुणीच आतापर्यंत संपूर्ण ज्ञानेश्वरी उलट्या अक्षरात लिहिण्याचा विक्रम केलेला नाही हे समजल्यानंतर त्यांनी जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड फॉर इंडिया बुक शी संपर्क केला. त्यांनी या विक्रमाला मान्यता दिली आता येत्या २८ रोजी त्यांना याबद्दल चे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी स्नेहालयाचे संस्थापक प्रा .डॉ. गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध चित्र शिल्पकार प्रमोद कांबळे, जिनियस फाउंडेशनचे अध्यक्ष पवन सोलंकी, श्न्यायडर इलेक्ट्रिकचे संचालक अरविंद पारगावकर, संदीप महाजन, साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. एस एस दीपक आदी उपस्थित राहणार आहेत.