मुंबई,दि.९ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बैठक रविवारी (दि.८ जानेवारी) पुण्याच्या गहुंजे स्टेडियवर पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना क्लब गटाकडून सदस्यपदी निवडले गेले आणि त्यानंतर त्यांची एमसीएच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली आहे. आमदार पवार एमसीएच्या १६ सदस्यीय समितीत नव्याने जोडले गेले असून बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदाविषयी मोठा निर्णय घेऊन त्यांच्यावर अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, रोहित पवार यांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील यापूर्वी एमसीएचे अध्यक्ष राहिले आहेत. शरद पवारांनी २०१३ आणि त्याआधी २००१-०२ मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदाची भूमिका पार पाडली होती. आता शरद पवारांचा हा वारसा रोहित पवार पुढे चालवतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. त्याव्यतिरिक्त खासदार शरद पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
आमदार रोहित पवार यांना स्वतःला देखील क्रिकेटची खास आवड आहे. त्यांना अनेकदा सर्वसामान्यांसोबत क्रिकेट खेळताना पाहिले गेले आहे. त्यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून देखील अनेकदा त्यांच्या मतदारसंघातील संघांसोबत क्रिकेट खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. आता त्यांची थेट महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने एक मोठी जबाबदारी ते यापुढे पार पाडणार आहेत.