मुंबई, दि.१६ जानेवारी –
खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी असल्याची टीका काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबीयांवर केली आहे. इतकंच नाही तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, मोक्का लावा, अशी मागणी सुद्धा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले आहे.
काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आज जालन्यात पत्रकारपरिषद घेत ते बोलत होते. क्रिप्टो करन्सी आणि आर्थिक देवाण घेवाणीतून जालन्यातील मंगरूळ येथील किरण खरात यांना मारहाण करण्यात आली असून काही गुंडानी त्यांचे अपहरण करून टॉर्चर केले आहे. त्यामुळे पोलिसांनी अपहरण करणाऱ्या गुंडांवर कारवाई करावी, अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली आहे.
दोन दिवसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपण भेटणार असल्याचे म्हटले आहे. व्यवहारातून हा प्रकार झाला असून व्यवहारात फायदा झाला की, मजा करायची आणि तोटा झाला की लोकांना मारायचे असे योग्य नाही असं सांगत किरण खरात यांच्या विरोधात तुम्हांला पोलिसांत देखील तक्रार करता येत होती असे सांगायलाही गोरंटयाल विसरले नाहीत. किरण खरात याचे दोन वेळा अपहरण करण्यात आले असून पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करावे अशी मागणीही गोरंटयाल यांनी केली. आरोपींनी किरण खरात याच्या घरी जाऊन केलेल्या टॉर्चरचे व्हिडीओ देखील गोरंटयाल यांनी पत्रकारांना दिले आहे. दरम्यान, गोरंट्याल यांच्या या आरोपानंतर झोल आणि खोतकर कुटुंबीयांनी याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.