Homeनगर शहरएमआयडीसी पोलीसांनी हटविला नगर-मनमाड महामार्गावरील अनाधिकृत बाजार

एमआयडीसी पोलीसांनी हटविला नगर-मनमाड महामार्गावरील अनाधिकृत बाजार

अहमदनगर,दि.२६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणारे भाजी विक्रेते, थाटण्यात आलेले विविध दुकानांचे अतिक्रमण एमआयडीसी पोलीसांनी शनिवारी (दि.25 फेब्रुवारी) हटविले. हा बाजार महामार्गाला लागून भरत असल्याने वाहतुकीस कोंडी निर्माण होऊन लहान-मोठे अपघात घडत होते.
काही दिवसांपूर्वी सदर अतिक्रमण हटविण्यासाठी भाजपा अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा शारदा गायकवाड व नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते. तर हे अतिक्रमण हटविण्यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशन व एमआयडीसी व्यपस्थापनाकडे सातत्याने मागणी सुरु ठेवली होती.

अखेर या मागणीला यश आले. एमआयडीसी पोलीस प्रशासनाने रस्त्यावर आलेले भाजी विक्रेते व इतर व्यावसायिकांना लावलेली दुकाने हटविण्याच्या सूचना केल्या. संबंधितांनी सर्व दुकाने हलवून रस्त्याच्या मागे सरकून वाहतुकीला अडथळा होणार नाही, या पध्दतीने लावली आहेत.
एमआयडीसी येथील सनफार्मा चौक ते सह्याद्री चौक तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या कडेला भाजी व फळ तसेच मटण- मच्छी बाजार भरत असतो. प्रत्येक विक्रेत्याने जास्त ग्राहक आपल्यापर्यंत कसे पोहचतील या अपेक्षेने थेट रस्त्यावरच्या जागेची निवड करून तेथे भाजीपाला विक्री व टपर्‍यांचे अतिक्रमण करुन दुकाने थाटली होती. नागरिकांना जीव मुठीत धरुन या भागातून जावे लागत आहे. येथे खरेदीला आलेला ग्राहक वर्ग देखील रस्त्यावर वाहने लावून भाजी व इतर साहित्य खरेदी करत असल्याने वारंवार वाहतुक कोंडीचा प्रश्‍न उद्भवत होता. या बेशिस्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. जीव धोक्यात घालून रस्त्यावर भरणारा बाजार मागे सरकून भरविण्याची मागणी गायकवाड यांनी केली होती.  


भाजीविक्रेत्यांना मागे सरकून बसविण्यासाठी नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशनने पुढाकार घेतला होता. मात्र प्रशासनाची साथ न मिळाल्यने हा विषय बारगळला. यासाठी उपोषण करण्याची वेळ आली. हा धोकादायक बाजार नागरिकांच्या जीवावर उठण्याची शक्यता होती. पोलीस प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केलेल्या कारवाईचे स्वागत आहे. संघटनेच्या माध्यमातून भाजी, फळ इतर व्यावसायिकांना मागे सरकून शिस्तबध्द बाजार भरविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

अंतोन गायकवाड (अध्यक्ष, नागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी असोसिएशन)


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!