अहमदनगर,दि.२१ जानेवारी,(प्रतिनिधी) – हळदी-कुंकू कार्यक्रमात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन, हिंदू संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या आरोग्यदायी व पर्यावरणासाठी उपयुक्त तुलसीच्या रोपांचे वाण महिलांना देण्यात आले. तर घराच्या अंगणात तुलस फुलवून संस्कृती जोपासण्याचा संदेश देण्यात आला.
रायझिंग युथ अॅण्ड ट्रॅव्हल फाऊंडेशनच्या वतीने बुरुडगाव रोड येथील सौरभ कॉलनीत महिलांचा हा पारंपारिक सोहळा पार पडला. यावेळी फाऊंडेशनच्या अध्यक्षा अॅड. प्रणाली चव्हाण, सुनिता थिटे, वैशाली शिंदे, संध्या चव्हाण, सुरेखा भोसले, पूजा कोटेचा, मनिषा भळगट, हर्षदा पलोड, अॅड. अनिता दिघे, अॅड. गौरी सामलेटी, स्विटी लोढा, कुलकर्णी, दिपाली चव्हाण, घोडके, निलीमा पाटकर, प्रिया चौधरी, सारिका गुंदेचा, मोहिनी दानवे, ठोकळ आदींसह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अॅड. प्रणाली चव्हाण म्हणाल्या की, पाश्चात्य संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने आपल्या हिंदू संस्कृती जपण्याचे काम महिलांनी करावे. अंगणातील तुलस ही एक आपल्या संस्कृतीचा भाग आहे. या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमातून आपल्या संस्कृतीला उजाळा मिळतो. तर एकमेकांच्या विचारांची देवाण-घेवाण होत असते. महिलांनी आरोग्य व पर्यावरणासाठी उपयुक्त असलेली तुलस अंगणात लावण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी महिलांचे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गावती चव्हाण यांनी केले. आभार स्विटी लोढा यांनी मानले.