राहाता,दि.२४ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – लावणी डान्सर गौतमी पाटील हिचा डान्स पाहण्यासाठी लोक मोठी गर्दी करतात. बऱ्याचदा लोकांनी तिच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याचेही पाहायला मिळाले आहे. आता गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गौतमीचा अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राडा झाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी रात्री गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असताना काही हुल्लडबाजांनी पैसे उधळले. त्यांनी स्टेजवर पैसे उधळले. परिणामी नाराज झालेल्या गौतमीने डान्स करायचा थांबवला. यामुळे गोंधळ सुरू झाला. या हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांचा लाठीचार्ज सुरू झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. या प्रकारानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात गौतमीला कार्यक्रमस्थळावरून बाहेर काढण्यात आले.