नाशिक,दि.१ जानेवारी, (ऑनलाईन प्रतिनिधी) – इगतपुरी (Igatpuri) येथील जिंदाल पाॅलीफिल्म कंपनीत आज सकाळी साडे अकराला बाॅयलरचा भीषण स्फोट (Fire) झाला. त्यामुळे कंपनीच्या लगतच्या विभागातील ज्वलनशील कच्चा माल व अन्य वस्तूंना मोठी आग लागली. आग लागली तेव्हा या विभागात सुमारे दोनशे महिला व कर्मचारी काम करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे अनेक कर्मचारी जखमी किंवा मृत झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. कंपनीत भीषण आग लागली. या आगीचे व धुराले लोळ सुमारे तीन किलोमीटर अंतरावरून देखील दिसत होते. त्यामुळे कंपनीच्या प्रवेशद्वारावर कर्मचारी तसेच अन्य नागरिकांची मोठी गर्दी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव कोणालाही आत सोडले जात नव्हते.
दरम्यान आगीची भीषणता लक्षात घेता नाशिक महापालिका, ठाणे महापालिका तसेच परिसरातील सर्व अग्नीशमन यंत्रणांना सुचना देण्यात आल्या. सुमारे पंचवीस बंब आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. आगआटोक्यात येण्यासाठी अथक प्रयत्न करूनही यश आले नाही. दोन तास धुराचे लोट निघतच होते. त्यामुळे जखमी व प्राणहानी मोठी असू शकते असे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
या कंपनीत शेकडो कामगार काम करतात. स्फोट ज्या विभागात झाला, तेथे मोठ्या प्रामणात महिला कर्मचारी काम करीत होत्या. अन्य कर्मचारी देखील अडकले होते. त्यातील फार कमी लोकांना तेथून बाहेर पडता आले होते. दरम्यान जिल्हाधिकारी तसचे इगतपुरीचे तहसीलदार घटनास्थळी रवाना झाले आहेत. पालकमंत्री दादा भुसे यांनी विविध यंत्रणांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना देत ते स्वतः जिंदाल कंपनीकडे रवाना झाला. ही घटना घडली तेव्हा आमदार हिरामण खोसकर येवला येथे होते. त्यांनी आपल्या मुलाला कर्मचाऱ्यांच्या मदतीला पाठवले. वैद्यकीय मदत मिळावी यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.