अहमदनगर,दि.१९ मार्च,(प्रतिनिधी) – सर्व समाज घटकांना जोडून ठेवणारे साहित्य निर्माण व्हायला हवे, गावचे गावपण ग्रामीण साहित्यातून पुढे आल्यास नव्या पिढीला मार्गदर्शन होईल, सध्य परिस्थितीमध्ये माणसांना एकत्र आणणारे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे, ते ग्रामीण भागातील साहित्यिकच निर्माण करू शकतात असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजार येथील प्रशिक्षण केंद्रात बाळासाहेब अमृते यांच्या ‘बाळ अमृत’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन व जिल्हास्तरीय काव्य संमेलन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्राचार्य खासेराव शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा.मेधाताई काळे, शब्दगंध चे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.शंकरराव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन पै.उद्धवराव अमृते, उद्योजक जालिंदर तनपुरे, आष्टी येथील साहित्यिक डॉ.एन.डी.चौधरी,पी.एम.साठे सर व शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी विचारपिठावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की,तरुणाईला साहित्याची आवड लागण्यासाठी अशा प्रकारचे छोटे-छोटे काव्य संमेलन व साहित्यिक कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये करणे आवश्यक असून शब्दगंध त्यासाठी पुढाकार घेत आहे,ही अतिशय चांगली बाब आहे.नवीन लिहिणाऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम शब्दगंध सातत्याने करत आहे, हे पाहून आनंद वाटत आहे.’. यावेळी प्रा.मेधाताई काळे म्हणाल्या की,’साहित्य हे मनोरंजनासाठी नसून प्रबोधनासाठी आहे, बालमनावर सुसंस्कार करण्याचे बाळासाहेब अमृते यांचे प्रयत्न निश्चितच चांगले प्रेरणादायी असून बाळ अमृत काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्रबोधनाची कविता त्यांनी लिहिली आहे.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता यांच्या कवितेतून दिसत असून धर्माच्या नावाखाली देशाची अधोगती करू नये,असा संदेश बाळासाहेब अमृते देत आहेत. अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले की, ‘सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य हे महत्त्वाचे असून कविता त्यातील एक घटक आहे, कमी शब्दात जास्तीत जास्त व्यक्त होण्याचे कसब बाळ अमृत या काव्यसंग्रहामध्ये असून प्रबोधनात्मक कविता असल्याने ही कविता दीर्घकाळ टिकणारी कविता आठवणीत राहणारी आहे’. यावेळी डॉ.एन.डी.चौधरी, पै. उद्धवराव अमृते, पी.एम.साठे, जालिंदर तनपुरे यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले. स्वागत राज्य कार्यकारणी सदस्य रामकिसन माने यांनी केले तर शेवटी अशोक बोरुडे सर यांनी आभार मानले. यावेळी झालेल्या जिल्हास्तरीय काव्य संमेलनामध्ये कवी गिताराम नरवडे (टाकळी खादगाव), आत्माराम शेवाळे (शेवगाव), बाळासाहेब मुंतोडे (राहुरी), मारुती खडके (चिचोंडी पाटील), अनिल गायकवाड (नगर), सुभाष सोनवणे (नगर), बबनराव गिरी (आष्टी), कृष्णा अमृते यांनी कविता सादर केल्या.
कार्यक्रमास हनुमंत भुतकर, संपतराव रोहकले,पै.नाना डोंगरे,प्रा.डॉ.अशोक कानडे,दीपक अमृते,बाळासाहेब कोळेकर,सरपंच बाबासाहेब अमृते,माजी सरपंच रवींद्र अमृते, अंबादास तागड, विजय अमृते, विकास साबळे, शिवाजी साबळे, बंडू झांजे, सुरेश झांजे, सौ.शोभाताई पवार, सौ. रेणुकाताई पुंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे, रामकिसन माने, बबनराव गिरी, सौ.सुरेखा अमृते, प्रसन्न पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शब्दगंध च्या वतीने कवी बाळासाहेब अमृते यांचा पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपत्नीक सत्कार करण्यात आला. तर कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्ञानदेव पांडुळे यांचा हिवरे बाजार ग्रामस्थांच्यावतीने पोपटराव पवार यांनी सत्कार केला.