पारनेर, १२ मे २०२३ – पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथे शेतीच्या कामासाठी आलेल्या युवकावर बिबट्याने हल्ला केला आहे. हा हल्ला गुरूवारी रात्री केला आहे. यात युवक गंभीर जखमी झाला आहे.
की पाडळी रांजणगाव येथील बाळासाहेब करंजुले यांच्या शेतात कांदा काढणी व काटणीसाठी सहा कामगार व एक युवक गेले आठ दिवसांपासून रहिवास करत आहे. गुरूवार दि. ११ रोजी दिवसभर कांदा काढणीचे काम करून सायंकाळी ९ वाजता घराबाहेर पडवीत सर्व झोपले असताना रात्री दोनच्या सुमारास बिबट्या तेथे आला.
दिवसभर काम केल्यानंतर सर्व कामगार गाढ झोपेत असताना कडेला झोपलेल्या आदित्य देवानंद गायकवाड (वय- १६, रा. दिवरंग, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) या युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. बिबट्याने आदित्य याच्या मानेला धरल्यानंतर तो किंचाळू लागला. आदित्यच्या आवाजानेशेजारी झोपलेले त्याचे नातेवाईक जागे झाले. त्यांना आदित्यवर बिबट्या हल्ला करत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून धूम ठोकली.
आदित्य याच्या मानेला मोठी जखम झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मालक बाळासाहेब करंजुले यांनी राष्ट्रवादीचे सेवा सोसायटीचे संचालक देविदास रावडे यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यांनी रूग्णवाहिकेला संपर्क केल्यानंतर रूग्णवाहिकेच्या सहाय्याने त्याला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान सरपंच तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कळमकर म्हणाले, गेली अनेक दिवसांपासून पाडळी रांजणगाव, कळमकरवाडी व कडूस परिसरात बिबट्याचे वास्तव आहे. शेतकर्यांना काम करताना त्याचे दर्शन होत होते. याबाबत वनविभागाला अनेक वेळा संपर्क साधून पिंजरा लावण्याची विनंती केली. मात्र त्यांनी गांभीर्याने घेतले नाही. असेच हल्ले होत राहिले तर शेतकर्यांना कामासाठी बाहेर पडणे अवघड होईल.
गेल्या अनेक दिवसांपासून पाडळी रांजणगावमध्ये बिबट्या वावरत असताना वनविभागाने दखल न घेतल्याने युवकावर जिवघेणा हल्ला झाला. आदित्य व इतर सहा शेतीच्या कामासाठी दारोदार फिरून आपली उपजीविका करतात. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही मिळेल ते काम करतो. आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आम्ही सहकुटुंब सहा ते सात महिने मिळेल ते काम करतो. रात्री झोपल्यानंतर आदित्यवर जिवघेणा हल्ला झाला. आमची परीस्थिती गरीब असल्याने पुढील खर्चासाठी वनविभागाने मदत करावी. वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा